क्राईम
चार वर्षांपासून फरार असलेला खूनाचा आणि मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी युनिट ४ कडून जेरबंद
14 September 2026 |
3:59 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मोठी कारवाई करत, गेल्या चार वर्षांपासून खूनाच्या व मोक्का (MCOCA) गुन्ह्यात फरार असलेल्या एका पाहिजे आरोपीला बेळगाव (कर्नाटक) येथून शिताफीने जेरबंद केले आहे. मोईनुद्दीन जाकर शेख उर्फ मोईन कालू शेख (वय २८, रा. बन्नेरघट्टा रोड, बोस मिको जवळ, अड्डगोडी, पुखराज लेआउट जवळ, बंगलोर साऊथ, बंगलोर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम ३०२, ३८४, ५०६ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ चे कलम ३(१)(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात मोईनुद्दीन शेख हा गेल्या चार वर्षांपासून फरार होता. तो सातत्याने स्वतःचे मोबाईल नंबर बदलत होता.
युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमजद शेख व अनिकेत भोसले यांना मिळालेल्या गोपनीय खबऱ्यावरून आरोपी हा कर्नाटक राज्यात असून, तो गांजा सेवन व विक्रीच्या धंद्यात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ठाणगुडी (कर्नाटक) व बंगलोर परिसरात असल्याची माहिती निष्पन्न झाली.
त्यानुसार, दिनांक ११/०१/२०२६ रोजी पोउपनि दिग्विजय चौगले यांचे पथक खाजगी वाहनाने बंगलोर येथे रवाना झाले. आरोपीची वेशभूषा करून (अमजद – चहा विक्रेता, राजपुत-मेकॅनिक) पाळत ठेवली असता, तो बेंगलोरहून बेळगावडे निघाल्याचे समजले. सार्वजनिक वाहतुकीत असल्याने चालू वाहनात कारवाई करणे अशक्य असल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अखेर बेळगावमधील माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून ‘चिल्ड्रेन गार्डन’ बेळगाव येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे कबूल केले. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला ताब्यात देण्यात आले असून, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.
क्राईम
प्रेमसंबंधाच्या तणावातून बारामतीत १९ वर्षीय तरुणाने जीवन संपविले
13 September 2026 |
2:10 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
शहरातील सूर्यनगरी परिसरात प्रेमसंबंधाच्या तणावातून १९ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना घडली. अविष्कार अमोल ढोले (वय १९, मूळ रा. कुरवली, पंढरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अविष्कार बारामतीत शिक्षणासाठी राहत होता. त्याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर अविष्कार मानसिक तणावात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
शनिवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास सूर्यनगरी येथील जयश्री अपार्टमेंटमधील राहत्या खोलीत अविष्कारने स्वतःकडील पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेत वापरलेले पिस्तुल अविष्कारकडे कुठून आले, त्याच्याकडे ते कसे पोहोचले, तसेच या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम पुढील तपास करीत आहेत.
क्राईम
मंगळदोष दूर करण्याच्या नावाखाली विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा
13 September 2026 |
2:01 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
अंधश्रद्धेच्या नावाखाली २९ वर्षीय विवाहित महिलेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार चंदननगर परिसरात उघडकीस आला आहे. पतीला मंगळदोष असल्याचे सांगून तो दूर करण्याच्या नावाखाली महिलेला कथित अघोरी विधी करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, विवाह ठरण्यापूर्वीच सासरच्या मंडळींकडून महिलेच्या कुटुंबीयांकडे १५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आली होती. मुलीचा विवाह व्हावा यासाठी तिच्या वडिलांनी ऑनलाइन पद्धतीने २ लाख २० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्कम न दिल्याच्या कारणावरून विवाहानंतर महिलेचा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, महिलेच्या पतीला मंगळदोष असल्याचे सांगण्यात आले. हा दोष दूर करण्यासाठी भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेला विविध कथित अघोरी कृत्ये करण्यास भाग पाडण्यात आल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. यामध्ये अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास भाग पाडणे तसेच पतीच्या खासगी अवयवाला हळदी-कुंकू लावून पूजा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. मंगळदोष दूर झाल्याचे सांगून सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदवून घेण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मंगळदोष दूर करण्याच्या कारणाखालीच आपल्याशी विवाह करण्यात आल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
सासरच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हुंड्याची मागणी, अंधश्रद्धेच्या नावाखाली करण्यात आलेले कथित विधी आणि महिलेचा झालेला मानसिक व शारीरिक छळ या सर्व बाबींची पोलीस चौकशी करत आहेत.
माझा जिल्हा
निंबुतच्या शिक्षिका सौ. सुवर्णा शेंडकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
13 September 2026 |
4:58 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरव
निंबूत : पंचायत समिती बारामती यांच्या वतीने सन २०२२-२०२६ चा गुणवंत शिक्षक पुरस्कार केंद्रीय प्राथमिक शाळा निंबूत येथील शिक्षिका सौ. सुवर्णा महेंद्र शेंडकर यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सौ. सुवर्णा शेंडकर यांनी आपल्या शैक्षणिक सेवेला भोर येथे सुरुवात केली. त्यानंतर शेंडकरवाडी आणि सध्या निंबूत येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत त्यांनी सेवा बजावली आहे. शांत स्वभाव, कामातील एकाग्रता, विद्यार्थ्यांशी आपुलकीचा संवाद आणि सातत्याने शैक्षणिक कार्यात व्यस्त राहण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
शिक्षणासोबत संस्कारांचीही शिदोरी
बालवयातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांच्यावर योग्य संस्कार घडविणे, हा शेंडकर मॅडम यांच्या कार्याचा विशेष पैलू आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले असून, आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांशी असलेले त्यांचे नाते आजही कायम असून, त्यांच्या बॅचमधील अनेक विद्यार्थी आवर्जून शेंडकर मॅडम यांची भेट घेण्यासाठी येत असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते त्यांच्या कार्याची पावतीच मानली जाते.
सांस्कृतिक कार्यक्रमांतही उल्लेखनीय योगदान
शालेय स्नेहसंमेलन असो किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेंडकर मॅडम विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात नेहमीच पुढाकार घेतात. उत्कृष्ट कोरिओग्राफरची भूमिका बजावत त्या विद्यार्थ्यांना नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रशिक्षण देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याचे कामही त्यांनी केले आहे.

निंबूतच्या शाळेच्या जडणघडणीत मोठे योगदान
केंद्रीय प्राथमिक शाळा निंबूतच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीत सौ. सुवर्णा शेंडकर यांचे मोठे योगदान राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शेंडकर मॅडम यांच्या कार्याची दखल घेत पंचायत समिती बारामतीकडून त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सौ. सुवर्णा शेंडकर या माजी मंत्री विजयराव कोलते यांच्या भाची असून, सोरटेवाडी गावचे उपसरपंच महेंद्र शेंडकर यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल निंबूत परिसरातून तसेच शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ताज्या बातम्या
पणदरे येथे ३० वर्षीय विवाहित महिलेचा खून;
13 September 2026 |
4:18 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी अक्षय थोरात
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
डोक्यावर व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण करून गळा आवळल्याचा प्राथमिक संशय; पोलिसांकडून तपास सुरू
पांदरे, ता. बारामती : पांदरे गावाच्या हद्दीत राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पांदरे, ता. बारामती, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्यापूर्वी पांदरे येथील राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी रंजना लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने वैशाली पवार यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने मारहाण केली. तसेच टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी १२ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजल्यापासून १३ सप्टेंबर रोजी पहाटे २.५० वाजेपर्यंत घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी केली आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ताज्या बातम्या
बारामती! बारामती तालुक्यात गणेशोत्सवाच्या आगमनाची जय्यत तयारी; मंडळांची लगबग सुरू
13 September 2026 |
2:16 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यात गणरायाच्या स्वागतासाठी गावागावांतील गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. आगमनाला एक दिवस शिल्लक असतानाच मंडप उभारणी, गणेशमूर्ती बसविण्यासाठी शेडची तयारी, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईच्या कामांना वेग आला आहे.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंडळांचे कार्यकर्ते विविध कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. कुठे मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर कुठे आकर्षक देखावे आणि सजावटीची तयारी सुरू आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात येत असल्याचे चित्र बारामती तालुक्यात दिसत आहे .
विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तयारीत केवळ मंडळांचे कार्यकर्तेच नाहीतर नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण आपल्याला जमेल असे उत्सवाच्या तयारीत सहभागी होत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव हा भक्तीबरोबरच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सामूहिक सहभागाचा सोहळा ठरत आहे.
गावागावांतील मंडप सजू लागले असून गणेशमूर्तींच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्यामुळे काही तासातच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने बारामती तालुक्यातील वातावरण भक्तिमय होणार. बारामती शहरा बरोबरच बारामती तालुक्यातील खेडेगावात देखील गणेशोत्सवाच्या आगमनाची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
ताज्या बातम्या
पाण्यावर तवंग आणि उग्र वास; ग्रामस्थांनी आग लागल्याचा केला दावा, प्रशासनाकडून तपास सुरू
12 September 2026 |
3:41 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
दुष्काळी तालुक्यात पाण्यासाठी वणवण सुरू असतानाच उमदी येथे एका विहिरीतून पाण्यासोबत पेट्रोलसदृश पदार्थ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विहिरीच्या पाण्यावर पेट्रोलसदृश तवंग दिसून येत असून उग्र वासही येत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा पदार्थ नेमका कोणता आहे आणि तो विहिरीच्या पाण्यात कसा पोहोचला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.
उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश वास येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, काल सायंकाळी विहिरीच्या पाण्यावर पेट्रोलसदृश पदार्थाचा तवंग स्पष्टपणे दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विहिरीतील पाणी शेतात सोडल्यानंतर पेट्रोलसदृश वास आणि तवंग मोठ्या प्रमाणात जाणवू लागला.
यानंतर काही शेतकऱ्यांनी काडीपेटी ओढून पाण्यात टाकल्यानंतर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या भागापर्यंत विहिरीचे पाणी शेतात गेले होते, त्या परिसरातही आग लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे विहिरीला खरंच पेट्रोलचे झरे लागले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश पदार्थ येण्याचे नेमके कारण काय, याची तपासणी सुरू केली आहे. विहिरीच्या समोरच पेट्रोल पंप असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपातून काही प्रकारची गळती होऊन हा पदार्थ विहिरीच्या पाण्यात मिसळला आहे का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, संबंधित पदार्थ खरोखर पेट्रोल आहे का, तो नेमका कोणता आहे आणि विहिरीच्या पाण्यात तो पोहोचला कसा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेनंतर उमदीसह परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
जत तालुका आधीच दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून अनेक भागांत पाण्याची चणचण आहे. अशा परिस्थितीत विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश पदार्थ आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पदार्थाचे स्वरूप आणि घटनेचे नेमके कारण प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
माझा जिल्हा
पाषाण-बावधन रस्त्यावर भीषण अपघात; सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
12 September 2026 |
3:33 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
१९ वर्षीय तरुण कार चालवत असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती; चतु:शृंगी पोलिसांकडून तपास सुरू
पाषाण-बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डनजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअर विरेंद्र द्विवेदी यांचा मृत्यू झाला. भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना त्याच कारमधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र द्विवेदी हे नियमितपणे व्यायाम करत होते. त्यावेळी पाषाण-बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डनजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या कारने द्विवेदी यांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. द्विवेदी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
या अपघातातील कारच्या मालकीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार BLUERAYS Developers या कंपनीच्या नावावर असल्याचे समजते. तसेच कारचा पत्ता ABIL हाऊसचा असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, अपघाताच्या वेळी ही कार नेमकी कोणाच्या ताब्यात होती आणि कार कोण चालवत होते, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार १९ वर्षीय तरुण चालवत होता.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
ताज्या बातम्या
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुरस्कार: महाराष्ट्राची देशात ऐतिहासिक मुसंडी; एकूण ५७ पैकी २१ पुरस्कारांवर कोरले नाव
11 September 2026 |
4:43 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी जाहीर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोन्ही वर्षांतील मिळून एकूण ५७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या नावावर केले आहेत.
सर्वोत्कृष्ट ‘वसंतदादा पाटील’ पुरस्कार विजेते
- २०२४-२५: भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, पुणे
- २०२५-२६: क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, सांगली
वर्ष २०२४-२५ मधील प्रमुख विजेते
- ऊस विकास (उच्च उतारा गट): श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर (प्रथम)
- तांत्रिक कार्यक्षमता: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, सातारा (प्रथम)
- आर्थिक व्यवस्थापन: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सोलापूर (तृतीय)
- सर्वाधिक साखर उतारा: भोगावती सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना (उच्च उतारा): छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर
वर्ष २०२५-२६ मधील प्रमुख विजेते
- तांत्रिक कार्यक्षमता: निरा-भीमा सहकारी साखर कारखाना, पुणे (प्रथम), विलास सहकारी साखर कारखाना, लातूर (द्वितीय), श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे (तृतीय)
- ऊस विकास (उच्च उतारा गट): सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, सोलापूर (तृतीय)
- सर्वाधिक साखर उतारा: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा
- सामाजिक उत्तरदायित्व (CSR): राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली
- सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, सोलापूर
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातला प्रत्येकी ८, पंजाब आणि तमिळनाडूला प्रत्येकी ५, हरियाणाला ३, कर्नाटक व छत्तीसगडला प्रत्येकी २, तर मध्य प्रदेश, ओडिशा आणि दिल्लीला प्रत्येकी १ पुरस्कार मिळाला आहे. कारखान्यांची कार्यक्षमता, ऊस विकास, तांत्रिक कार्यक्षमता, आर्थिक व्यवस्थापन, साखर उतारा, सहकारी व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्व या निकषांवर ही निवड करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली येथे लवकरच होणार आहे. या सोहळ्यासाठी मान्यवर केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील मंत्री आणि साखर उद्योगातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. साखर उद्योगातील संशोधन आणि सहकार क्षेत्रातील योगदानासाठी यंदा विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. तसेच, महासंघाकडून यंदा ऊस उत्पादकता वाढ, पाणी व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अचूक शेती आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर दिला जात आहे.
मुंबई
महावितरणच्या ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले; तीन महिन्यांत ६६ कोटींची चोरी उघड
11 September 2026 |
4:28 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
महाराष्ट्रात वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने (MSEDCL) तैनात केलेल्या डिजिटल एआय (AI) नेटवर्क आणि भरारी पथकांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एआयच्या मदतीने राज्यभरात वीजचोरीची तब्बल २७ हजार ९६४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
महावितरणच्या आकडेवारीनुसार, उघडकीस आलेल्या प्रकरणांपैकी २४ हजार ५०८ प्रकरणांचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन पूर्ण झाले असून, याद्वारे अंदाजे ६६.२८ कोटी रुपयांची वीजचोरी समोर आली आहे. महावितरणचे डेटा तज्ज्ञ एआय मॉड्यूलच्या साहाय्याने वीज वापराच्या पद्धतींमधील सूक्ष्म बदलांवर सतत लक्ष ठेवून असतात. ग्राहकांच्या वीज वापरात अचानक घट किंवा संशयास्पद बदल आढळल्यास, ते कनेक्शन तत्काळ तपासणीसाठी चिन्हांकित केले जाते आणि १९० भरारी पथके घटनास्थळी धाव घेतात.
चोरीची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर महावितरणने संबंधित ग्राहकांना सुधारित बिले आणि दंड जारी केला आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत:
- १० हजार ८१० प्रकरणांमध्ये एकूण २९.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
- चोरीची रक्कम आणि तडजोडीचे शुल्क भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत.
- राज्यभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये २८९ एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहेत.
विभागीय आकडेवारी (वीजचोरीची सर्वाधिक प्रकरणे)
- कोकण विभाग: ११,०८३ (सर्वाधिक)
- नागपूर विभाग: ५,९४९
- पुणे विभाग: ५,८४९
- छत्रपती संभाजीनगर विभाग: ५,०८३
एआय तंत्रज्ञान आणि भरारी पथकांच्या या प्रभावी समन्वयामुळे वीजचोरीच्या पारंपरिक क्लृप्त्या आता कुचकामी ठरत असून, वीजचोरांवर मोठा जरब बसला आहे.
माझा जिल्हा
अनंत चतुर्दशीचा ‘ड्राय डे’ कायम; १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ नंतर मद्यविक्रीला परवानगी
11 September 2026 |
4:17 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या सलग १२ दिवसांच्या दारूबंदीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने कडाडून विरोध केल्यानंतर प्रशासनाने महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या सुधारित आदेशानुसार, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी केवळ संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच दारूबंदी लागू असेल, त्यानंतर मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी असणारा ‘ड्राय डे’ पूर्णपणे कायम ठेवण्यात आला असून, त्या दिवशी पुण्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील.
या वर्षीच्या गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या मुद्द्यासोबतच १२ दिवसांच्या दारूबंदीचा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. केवळ पुणे जिल्ह्यातच सलग १२ दिवस दारूबंदी लादण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत शेठना यांच्या खंडपीठाने अशा प्रकारच्या सरसकट दारूबंदी पद्धतीचा निषेध करत प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले होते.
इतक्या लांबलेल्या दारूबंदीमुळे नियमित मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींना गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे अचानक रुग्णालयांमध्ये गर्दी वाढेल, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली होती. “सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे हा हेतू असू शकतो, पण मद्यप्राशन करणारी प्रत्येक व्यक्ती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल असे मानणे चुकीचे आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होईलच, लोकांना सण आनंदात साजरा करू द्या,” अशा शब्दांत न्यायालयाने प्रशासनाला सुनावले होते. केवळ एकाच जिल्ह्यासाठी असा निर्णय का, असा सवाल करत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास कडक आदेश देण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. या न्यायालयीन दणक्यानंतर प्रशासनाला अखेर नरमाईची भूमिका घेत वेळापत्रकात बदल करावा लागला आहे.
ताज्या बातम्या
दुर्मिळ आजाराचा चमत्कार: २६ वर्षे पुरुष म्हणून जगला, पण तपासणीत समोर आली शरीराची अद्भूत सत्यता
11 September 2026 |
4:09 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील एका रुग्णालयात वैद्यकीय विश्वाला अचंबित करणारी अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली आहे. लग्नानंतर मूल होत नसल्याने वंध्यत्व तपासणीसाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरुणाच्या शरीरात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बाह्य शरीराने आणि गुणसूत्रांनी पूर्णपणे पुरुष असणाऱ्या या तरुणाच्या पोटात स्त्रियांप्रमाणे पूर्ण विकसित झालेले गर्भाशय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राजौरी गार्डन येथील ‘आर. जी. हॉस्पिटल’मध्ये हा प्रकार उघडकीस आला. हा तरुण सामान्य पुरुषांसारखेच जीवन जगत होता आणि त्याच्यामध्ये पुरुषांची सर्व शारीरिक लक्षणे व गुणधर्म होते. मात्र, विवाहाfter काही वर्षे लोटूनही मूल होत नसल्याने त्याने युरोलॉजिस्ट डॉ. सुशील खरबंदा यांच्याकडे जाऊन वंध्यत्व तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
शारीरिक तपासणीदरम्यान त्याच्या अंडकोशाच्या पिशवीत दोन्ही टेस्टीज (वृषण) अनुपस्थित असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. वीर्य तपासणीत एकही शुक्राणू नसून ‘अझोस्पर्मिया’ ही स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफी आणि एमआरआय स्कॅनिंगमधील अहवाल पाहून डॉक्टरही थक्क झाले. हा तरुण जनुकीयदृष्ट्या ‘XY पुरुष’ असला, तरी त्याच्या पोटात पूर्णपणे विकसित झालेले गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबसारखी रचना असल्याचे समोर आले. त्याचे टेस्टीज पोटातच राहिल्यामुळे ते स्त्रियांच्या अंडाशयासारखे दिसत होते.
वैद्यकीय भाषेत या दुर्मिळ विकाराला ‘पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम’ (PMDS) म्हटले जाते. हा एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात विकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची गुणसूत्रे पुरुषांसारखीच असतात, परंतु शरीराच्या अंतर्गत रचनेत गर्भाशय कायम राहते. वयाची २६ वर्षे लोटेपर्यंत हा आजार कधीही लक्षात आला नव्हता.
पोटाच्या भागात दीर्घकाळ लपून राहिलेल्या टेस्टीजमुळे भविष्यात कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकत होता. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने पावले उचलत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करून ते गर्भाशय आणि टेस्टीज शरीरातून यशस्वीपणे बाहेर काढले आहेत. या दुर्मिळ घटनेने वैद्यकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ताज्या बातम्या
पुणे हादरले! MPSC अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा, राजीनाम्याची मागणी
11 September 2026 |
3:41 PM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी
कथित पेपरफुटी प्रकरणावरून MPSC प्रशासनावरील रोष अधिकच तीव्र झाला असून, संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी सहकाऱ्यांसह अधिकाऱ्याच्या दालनात प्रवेश करत काळे फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या दालनात हा प्रकार घडला असून, त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी सावंत यांनी केली आहे.
महेंद्र हरपाळकर यांनी राजीनामा दिला नाही, तर थेट MPSC अध्यक्षांच्या दालनात घुसून त्यांच्या तोंडालाही काळे फासले जाईल, असा उघड इशारा आण्णासाहेब सावंत यांनी दिला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आणि प्रमुख मागण्या
यापूर्वी, कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा आक्रोश मोर्चा काढला होता. ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि काही राजकीय नेते सहभागी झाले होते.
- कथित पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करावी.
- दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
- MPSC प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्य सरकारने या प्रकरणात ठोस भूमिका न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या या आक्रमक भूमिकेमुळे MPSC मधील कथित गैरव्यवहाराचा प्रश्न पुन्हा एकदा राज्यभरात ऐरणीवर आला आहे.
ताज्या बातम्या
सोमेश्वरच्या निवडणुकीत उमेदवारीचा पूर! इच्छुकांची वाढती संख्या नेत्यांसमोर मोठे आव्हान; नाराजीवर पडदा टाकण्यात यश येणार का? की बंडखोरीचे संकेत?
10 September 2026 |
2:23 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. विविध गटांकडून उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर दावेदारी करण्यात येत असल्याने नेत्यांसमोर उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदासाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक गटामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुकांनी आतापासूनच सभासदांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून, आपापल्या भागातील राजकीय व सामाजिक ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे.
उमेदवारी देताना नेत्यांची होणार दमछाक
एका बाजूला अनेक इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला प्रत्येक मतदारसंघाचा राजकीय समतोल साधण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. एखाद्या इच्छुकाला उमेदवारी दिल्यास दुसरा इच्छुक नाराज होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांची अंतिम निवड करताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेषतः स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या इच्छुकांना डावलणेही नेत्यांसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना जातीय, भौगोलिक, गट-तट तसेच सभासदांमधील वैयक्तिक संपर्क यांचा बारकाईने विचार केला जाण्याची शक्यता आहे.
नाराजीवर पडदा टाकण्यात नेते यशस्वी होणार का?
उमेदवारीचा अंतिम निर्णय झाल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये, यासाठी नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची समजूत काढून त्यांना सोबत ठेवण्यात नेते कितपत यशस्वी ठरतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी न मिळाल्यानंतर काही इच्छुकांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यास निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
नाराज करणार बंडखोरी?
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरोधात नाराज इच्छुकांनी बंडखोरी केल्यास अनेक मतदारसंघांतील लढतीचे चित्र बदलू शकते. त्यामुळे पक्ष, गट आणि पॅनेलच्या नेत्यांसाठी नाराजांची मनधरणी करणे हे उमेदवारी निश्चित करण्याइतकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी इच्छुकांची संख्या, गटबाजी आणि उमेदवारीसाठी सुरू असलेली चुरस अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत उमेदवारीचा ‘पूर’ नेत्यांसाठी संधी ठरणार की डोकेदुखी, तसेच नाराजीवर पडदा टाकण्यात नेते यशस्वी होणार की बंडखोरीचे झेंडे उभारले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ताज्या बातम्या
बारामती ! श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त वडगाव निंबाळकर भक्तिमय वातावरणात; नाभिक समाज व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग.
08 September 2026 |
11:05 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी -फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाज व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून भक्तिमय वातावरणात एकतरी मंडळाचे भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्री संत सेना महाराज यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भजनाच्या माध्यमातून उपस्थितांनी भक्तिमय वातावरणात श्री संत सेना महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये करण्यात आले होते .
कार्यक्रमाला वडगाव निंबाळकर येथील नाभिक समाज बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. समाजबांधवांनी एकत्र येत संत सेना महाराजांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी केली. यावेळी संत सेना महाराज ट्रस्ट यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमावेळी सोमेश्वर कारखाना संचालक शिवाजीराजे राजेनिंबाळकर , वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासक (सरपंच) सुनील ढोले , उपसरपंच संगीतभाभी शहा, माजी सभापती पंचायत समिती बारामती अविनाश (बाबा) शिंदे , बारामती पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार,नाभिक समाज बारामती तालुकाध्यक्ष धीरण पवार , संजय साळवे, राजूशेठ शहा, नानासाहेब मदने, रामभाऊ खंडाळे, काका राऊत,पांडुरंग पवार, भरत क्षीरसागर,जीवन बनकर आदी नाभिक संघटनेचे व संत सेना महाराज ट्रस्ट चे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता चंद्रकांत जाधव सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून केले.
ताज्या बातम्या
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत भाजपची पूर्ण ताकद! संपूर्ण पॅनेल मैदानात उतरवण्याचा सर्वानुमते निर्णय;
08 September 2026 |
3:34 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर, ता. बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२६-३१ च्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता भव्य शेतकरी सभासद व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी चंदर अण्णा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी शेतकरी सभासद, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच चंदर अण्णा तावरे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, माजी चेअरमन रंजन काका तावरे, माजी मार्केट कमिटी अध्यक्ष दिलीप आप्पा खैरे, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा दिग्विजयजी काकडे, डॉ. नितीन सावंत यांच्यासह बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा तालुक्यातील विविध मोर्चा, आघाडी व मंडल अध्यक्षांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेनंतर भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष शिखरजी वडणे यांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून संपूर्ण पॅनेल उभे करून सर्वच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय जाहीर केला.
कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. शेतकरी सभासदांचे प्रश्न, कारखान्याचे हित आणि आगामी काळातील कारखान्याची दिशा या मुद्द्यांवर निवडणूक लढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी कारखान्याचे आजी-माजी संचालक उपस्थित होते
निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष वरिष्ठ पदाधिकारी यांच्या विचारातून सर्वांनामूर्ती घेण्यात आला त्यानंतर
मेळाव्यास शेतकरी सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध तालुक्यांतील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे
गणेशोत्सव २०२६ : परिमंडळ-४ अंतर्गत आशीर्वाद पॅलेस येथे मंडळांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज
08 September 2026 |
3:08 AM |
प्रतिनिधी: mnewsmarathi
पुणे.प्रतिनिधी
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-४ च्या वतीने आगामी सार्वजनिक गणेशोत्सव – २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण नियोजन व समन्वय बैठक आशीर्वाद पॅलेस, लेन नंबर १, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, पुणे – १५ येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन व्हावे आणि भाविकांची सुरक्षा सुनिश्चित व्हावी, या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ही पूर्वतयारी बैठक आयोजित केली होती.
*बैठकीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती -*
या बैठकीस परिमंडळ-४ चे पोलीस उप-आयुक्त *मा. श्री. चिलुमुला रजनीकांत (भा.पो.से.)* हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत येरवडा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त *श्री. सुनील जैतापूरकर* आणि खडकी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त *श्री. ब्रम्हानंद गावडे* यांनी मंडळांना मार्गदर्शन केले.
तसेच बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. चंद्रशेखर सावंत*, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. उत्तम भजनावळे*, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. उमेश गीते*, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. राजेंद्र पन्हाळे*, विमानतळ / लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. रवींद्र कदम* आणि खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक *श्री. विक्रमसिंग कदम* हे देखील उपस्थित होते. यावेळी परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पोलीस प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण सूचना -*
बैठकीदरम्यान प्रशासनाकडून सर्व मंडळांना खालीलप्रमाणे कायदेशीर सूचना देण्यात आल्या –
१. गणेशोत्सव काळात सर्वोच्च न्यायालयाच्या व महाराष्ट्र शासनाच्या ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
२. मंडप उभारणी, विद्युत सुरक्षा, आपत्कालीन बाहेर जाण्याचा मार्ग (Emergency Exit) आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत नियमांचे पालन करावे.
३. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
४. सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा व महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उप-आयुक्त श्री. चिलुमुला रजनीकांत म्हणाले, “गणेशोत्सव हा पुण्याचा मानाचा व परंपरेचा सण आहे. या काळात कोणत्याही शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळाने घेणे बंधनकारक आहे. भाविकांची सुरक्षा आणि शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.”
*मंडळांची सहकार्याची ग्वाही -*
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, शांततापूर्ण आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याची एकमुखाने ग्वाही दिली.
या बैठकीमुळे पोलीस प्रशासन व सार्वजनिक मंडळे यांच्यात योग्य समन्वय निर्माण झाला असून, यंदाचा गणेशोत्सव कायदेशीर चौकटीत आणि उत्साहात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता न्यास, पुणे शहराचे विश्वस्त *श्री. विवेक देव* यांनी केले होते.
|