चौधरवाडी येथे श्री हनुमान मंदिर कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न
वीस वर्षांची प्रतीक्षा अखेर पूर्ण; माहेरवाशिनींच्या उपस्थितीने सोहळ्याला लाभली विशेष शोभा
चौधरवाडी, सोमेश्वर : चौधरवाडी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या कलश स्थापना सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तब्बल वीस वर्षांपूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते; मात्र काही अडचणींमुळे मंदिरावर कलश स्थापना करण्याचे काम प्रलंबित राहिले होते. अखेर श्रावणमासातील पवित्र आणि भक्तिमय वातावरणाचा योग साधत चौधरवाडी ग्रामस्थांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला.
कलश स्थापना सोहळा ह.भ.प. बालब्रह्मचारी देवेन्द्रजी महाराज निढाळकर (डोणजे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विधिवत पूजा, होम-हवन व धार्मिक विधी श्री. प्रभाकर पांडुरंग बोकील काका, सोमेश्वर-करंजे, पुरोहित व वेदशास्त्र तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या मंगल सोहळ्यासाठी चौधरवाडी गावातील सर्व माहेरवाशिनींना गावाच्या वतीने विशेष निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने माहेरवाशिनी, पाहुणे व ग्रामस्थ उपस्थित राहिले. माहेरवाशिनींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसराला आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण लाभले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-विधी, होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी अंतरराष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी कुलभूषण ह.भ.प. पं. मंगेश महाराज कदम, मृदंग अलंकार (एम.ए., एम.एड. इंग्लिश), आळंदी देवाची यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. त्यांच्या भक्तिमय वाणीतून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक विचारांची आणि भक्तीची अनुभूती मिळाली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
तब्बल वीस वर्षांनंतर श्री हनुमान मंदिरावर कलश विराजमान झाल्याने चौधरवाडी ग्रामस्थांसाठी हा दिवस श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा अविस्मरणीय सोहळा ठरला. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, माहेरवाशिनींचे, पाहुणे मंडळींचे, तसेच धार्मिक विधी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे चौधरवाडी ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
“वीस वर्षांची प्रतीक्षा संपली आणि श्री हनुमंताच्या चरणी कलश स्थापना होऊन चौधरवाडीच्या श्रद्धेला पूर्णत्व प्राप्त झाले,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
