प्रतिनिधी
अपंग कल्याण आयुक्तालयांतर्गत शासकीय निवासी संस्था, मिरज येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या शाळेत मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा देण्यात येते, असे शासकीय अपंग बालकगृह व व शाळेचे अधीक्षक यांनी कळविले आहे.
संस्थेच्या परिसरात इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते. इयत्ता ५ वी पासून माध्यमिक शाळेत जाण्या-येण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा देण्यात येते. शाळेमार्फत पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश मोफत देण्यात येतात. तसेच मुलींची काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक नेमले जातात.
वसतीगृहामध्ये मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था, मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यास पलंग, गादी, बिछाना व इतर साहित्य, आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी आदी सुविधा पुरविल्या जातात. अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकलही दिल्या जातात.
प्रवेशासाठी विद्यार्थी ६ ते १७ वयोगटातील असावा. प्रवेश अर्जासोबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेला अपंगत्त्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला व ३ फोटो जमा करणे आवश्यक राहील. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी, मिरज-४१६४१० तसेच संपर्क क्रमांक
९३२५५५५९८१,
९५५२२३४५८६
किंवा
९४२२२१६४५९ येथे संपर्क साधावा.