बारामतीत लाळ्या खुरकूत रोगाचे उच्चाटन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

बारामती तालुका पशुसंवर्धन विभागाने लंपी स्कीन रोगा पाठोपाठ लाळ्या खुरकूत रोगावर देखील नियंत्रण मिळवले आहे. सद्यस्थितीमध्ये लाळ्या खुरकूत संसर्गग्रस्त एकही जनावर बारामती तालुक्यामध्ये नसल्याची माहिती, तालुका पशुसंवर्धन विभागाने दिली.

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत पाळीव जनावरांमध्ये लाळ्या खुरकूतची साथ येते. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. सध्या बारामती तालुक्यात साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस तोडणी मजुरांची जनावरे दाखल झाली आहेत. ही जनावरे ऊस तोडणीनिमित्त गावोगावी फिरत असताना त्यांच्यामार्फत लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार होण्याची संभावना लक्षात घेत कारखाना कार्यक्षेत्र ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय दवाखाने अंतर्गत लाळ्या खुरकूतच्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे.

रोगाची लक्षणे

* जनावराचे खाणे-पिणे बंद होते. जनावरास ताप येतो.

* दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्‍यता

* जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.

* पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते.

* पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

प्रतिबंधात्मक उपाय…

* रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत.

* रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.

* रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा.

* रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे.

* रोगी जनावरे बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी.

* जनावरांचे दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत म्हणजे त्यांचे निर्जंतुकीकरण होईल, रोगप्रसार टळेल.

लाळखुरकूत लसीकरण सध्या तालुक्यामध्ये लसीकरण सुरू आहे. बारामती तालुक्यात एकूण गायवर्ग व म्हैस वर्ग जनावरे मिळून एक लाख ३३ हजार ८८३ जनावरे आहेत.

पहिल्या फेज मध्ये एकूण ३० हजार लसी मिळाल्या आहेत. झालेले एकूण लसीकरण १७ हजार जनावरांचे लसीकरण झालेले आहे. राहिलेली लस आठ ते दहा दिवसांमध्ये मिळेल. सध्या तालुक्यात कोठेही लाळखुरकूत साथ नाही.

– डॉ. डी. आर. पोळ, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, बारामती पंचायत समिती