मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारे जेरबंद; ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या

क्राईम

प्रतिनिधी

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आनंद लोहार, अक्षय अशोक मुरकुटे, गणपत जवाहरलाल शर्मा (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्स) आणि दर्शन रमेश पारीख (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्स) यांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील सांगवी आणि कासारवाडी भागात सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपींवर भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही घटनांमध्ये एकाच पद्धतीने सोनसाखळी हिसकावण्यात आली होती. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष करून हे चोरटे सोनसाखळी हिसकावत असायचे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा युनिटने कारवाई करत आरोपी आनंद सुनील साळुंखे उर्फ लोहार याला खडकी परिसरातून अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पाहिजे आरोपी महादेव उर्फ अजय गौतम थोरात यासह महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल चोरी करून सोनसाखळी हिसकावल्याचं तपासात निष्पन्न झाल.

आरोपी आनंद हा चोरीचे दागिने अक्षय अशोक मुरकुटे याच्यामार्फत ज्वेलर्स गणपत जवाहरलाल शर्मा आणि दर्शन रमेश पारेख यांना विकत असल्याचे पोलीस तपासात पुढे आलं आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे. आरोपींकडून साडेपंचवीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.