महाज्योती’चे एमपीएससी परीक्षेत ६३८ विद्यार्थी अंतिम यादीत

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) २०२२-२३ या वर्षात घेण्यात आलेल्या राजपत्रित अधिकारी वर्ग-१ व वर्ग-२ पदाच्या परीक्षेतील तात्पुरत्या गुणवत्ता यादीत बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) एकूण ६३८ विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले असून किमान १०० पेक्षा अधिक उमेदवार राजपत्रित अधिकारी पदावर होणार रुजू होण्यास पात्र ठरतील, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली आहे.

मुलाखतीनंतरच्या तात्पुरत्या निकालात प्रवर्गाच्या एकूण १ हजार ८३० विद्यार्थ्यांमध्ये महाज्योतीचे ओबीसी-३७०, एसबीसी-३४ व व्हीजेएनटी-२३४ असे एकूण ६३८ उमेदवार समाविष्ट आहेत. राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसवीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनाच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.

महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत प्रारूप गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशात प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.