पाकिस्तानला जाणारी आण्विक सामग्री जप्त; न्हावा शेवा सीमा शुल्क विभाग आणि सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई; पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कराराचा भंग

इतर

प्रतिनिधी

चीनमार्गे पाकिस्तानला आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी जहाजातून पाठविण्यात येणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य संयुक्त कारवाईत न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. यामध्ये २२,१८० किलोग्रॅम वजनाची ही सामग्री चीनमधील तैयुआन मायिनग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनीने पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनीअरच्या नावाने पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करीत कराचीकडे जाणारे एक संशयित व्यापारी जहाज कारवाई करण्यासाठी रोखले. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत जहाजावर आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य आढळून आले. सुरक्षा यंत्रणांनी संरक्षण संशोधन आणि संस्थेमार्फत (डीआरडीओ) या जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची तपासणी केली.

त्यानंतर पाकिस्तानच्या आण्विक उपक्रमांमध्ये क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आणि निर्मितीमध्ये या सामग्रीचा वापर केला जात असल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे सीएनसी मशिन वासेनार व्यवस्था अंतर्गत येते. यामध्ये आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण आणि लष्करी अनुप्रयोगासह वस्तूंचा प्रसार रोखणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये भारत सक्रिय आहे. संगणक न्युमेरिकल कंट्रोलच्या मशीनचा वापर याआधी उत्तर कोरियाने आपल्या अणु कार्यक्रमात केला असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सुरक्षा यंत्रणांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भारतीय संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देऊन सतर्क केले होते. त्यानंतरच सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून संगणक न्युमेरिकल कंट्रोलच्या मशीन जप्तीची कारवाई केली होती. चीनमधून पाकिस्तानला पाठविण्यात येणाऱ्या दुहेरी वापराच्या लष्करी दर्जाच्या वस्तू भारतीय बंदरात कारवाई करण्याची ही काही पहिली घटना नाही.

कॉसमॉस इंजिनीयिरग, या पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार कंपनीवर २०२२ पासूनच लक्ष आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये चीन औद्योगिक ड्रायरच्या आच्छादनाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत होता. याशिवाय नागरी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत केली आहे.