राज्यात दरवर्षी प्रतीक्षा यादीतील चारशे जणांचा प्रत्यारोपणाअभावी मृत्यू

माझा जिल्हा

प्रतिनिधी

मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर रुग्णाची प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड मिळविण्याची धावपळ सुरू होते. मूत्रपिंडाची गरज आणि प्रत्यक्षात प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होणारी मूत्रपिंडे यातील तफावत अनेक पटींनी जास्त आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील रुग्ण मूत्रपिंड मिळेल, या आशेवर वर्षानुवर्षे असतात. राज्यात दरवर्षी प्रतीक्षा यादीतील अशा सुमारे चारशे रुग्णांचा प्रत्यारोपणाअभावी मृत्यू होत आहे.

रुग्णाच्या रक्तातील नातेवाईक दाता नसेल तर त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नावनोंदणी करावी लागते. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडे सध्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीत १ हजार ६७२ रुग्ण आहेत. याचवेळी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रमाण अतिशय कमी आहे. पुणे विभागात २०२० मध्ये ३६ मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण झाले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या २०२१ मध्ये ४९, २०२२ मध्ये ६६ आणि २०२३ मध्ये ७४ आहे. यंदा आजपर्यंत २२ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाली आहेत. प्रतीक्षा यादीचा विचार करता ही संख्या अतिशय नगण्य आहे. यामुळे अनेक रुग्णांचा मूत्रपिंड प्रत्यारोपणाअभावी मृत्यू ओढवतो. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची नोंद मात्र झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात चार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समित्या आहेत. त्यात पुण्यासह मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागीय प्रत्यारोपण समित्यांचा समावेश आहे. राज्याचा विचार करता दरवर्षी मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीतील रुग्णांची संख्या सुमारे ५ ते ६ हजार असते. मागील वर्षी राज्यात १४८ मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान झाले. यामुळे प्रतीक्षा यादीत दिवसेंदिवस पडणारी भर आणि प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होणारे मूत्रपिंडासह इतर अवयव यात खूप मोठी तफावत आहे. राज्यात २०२० ते २०२३ या कालावधीत मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीतील १ हजार ७३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

अवयवदान करण्याबाबत सामान्य नागरिकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातही जनजागृती होणे आवश्यक आहे. मेंदुमृत व्यक्तीचे अवयवदान करताना त्याच्या पालकांच्या संमतीबरोबर डॉक्टरांचा पुढाकारही महत्त्वाचा ठरतो. अवयवदानातून इतरांना नवजीवन मिळू शकते, ही बाब सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. मागील काही वर्षांत अवयवदानाबाबत जनजागृती होत असल्याने त्यात वाढ होताना दिसत आहे, असे पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी सांगितले.

मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर रुग्णाला डायलिसिस करावे लागते. दीर्घकाळ डायलिसिस करण्याचे अनेक दुष्परिणाम रुग्णाच्या शरीरावर होतात. त्यातून रुग्ण दगावू शकतो. अवयवदानाबाबत जनजागृती झाल्यास अवयवदानात वाढ होऊन प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवीन जीवन मिळू शकेल. – डॉ. अनंत बीडकर, मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ