मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 16 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बारामती ! होळ हद्दीतील सस्तेवाडी- मगरवाडी रस्त्यावरील खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष; श्रावण महिन्यामध्ये सोमेश्वर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह स्थानिक ग्रामस्थ त्रस्त.

mnewsmarathi 31 Aug 2026 1 मिनिट वाचन 3,683 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

सध्या श्रावण महिना सुरू असून करंजे येथील सोमेश्वर देवस्थान दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी वर्दळ सुरू आहे. मात्र, होळ हद्दीतील सस्तेवाडी – मगरवाडी – करंजे रस्त्याची झालेली दुरवस्था भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरी रस्ता उखडल्याने वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.

करंजे येथील सोमेश्वर देवस्थान हे पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात विशेषतः भाविक या मार्गाने मोठ्या संख्येने दर्शनासाठी ये-जा करत असतात. मात्र रस्त्यावरील खड्डे ,उखडलेला डांबर आणि रस्त्याच्या कडेला साचलेली खडी यामुळे दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करून कसरत करावी लागत आहे.

रस्त्याच्या अनेक भागात खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी संपूर्ण रस्त्याचीच दुरवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे . खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांना रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जावे लागत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास त्यांची खोली लक्षात न आल्याने परिस्थिती आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे.

या मार्गाचा वापर सस्तेवाडी, चोपडज आणि आजुबाजूच गावखेडेचे ग्रामस्थ नियमितपणे करतात. मात्र रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रोजच्या प्रवासासाठी याच रस्त्यावरून ये-जा करावी लागत असल्याने ग्रामस्थही या रस्त्यावरून प्रवास करण्यास कंटाळले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

श्रावण महिन्यात सोमेश्वर देवस्थानाकडे भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आवश्यक असल्यास रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भाविकांच्या श्रद्धेचा मार्ग तरी खड्डेमुक्त करा! असा सवाल आता पंचक्रोशीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात असून प्रशासन या समस्येकडे कधी गांभीर्याने पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi