मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 25 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

जात पडताळणीसाठी आता ऑफलाइन अर्जाला पूर्णविराम! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

mnewsmarathi 25 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,326 वाचन

प्रतिनिधी

 

 जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने राबविण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जात पडताळणीसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच स्वीकारले जाणार असून, अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा ग्राह्य धरले जाणार नाहीत.

शासनाच्या या निर्णयामुळे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS) द्वारे अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाची सद्यस्थिती तपासणे शक्य होणार आहे.

कार्यालयात अर्जाची प्रिंट जमा करण्याची गरज नाही

नवीन प्रक्रियेनुसार अर्जदारांना आवश्यक मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करावी लागतील. अर्ज आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची प्रिंट काढून जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही प्रणाली आधार क्रमांकाशी जोडलेली असल्याने एका अर्जदाराला एकच अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना आणि कागदपत्रे अपलोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुनावणीही ऑनलाइन; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा

जात पडताळणी प्रक्रियेत सुनावणीची आवश्यकता भासल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाणार आहे. मात्र, विशेष व अपवादात्मक प्रकरणांमध्ये बाटीच्या महासंचालकांची खात्री झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीस परवानगी दिली जाऊ शकते. तसेच अर्जदारांना मार्गदर्शन आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शक्यतो ६० दिवसांत निर्णय

शासन परिपत्रकानुसार जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेणे अपेक्षित आहे. समितीचा निर्णय अर्जदाराला SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे. अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे सूचना दिल्या जातील.

शुल्कातही बदल; प्रयोजनानुसार वेगवेगळे दर

नवीन ऑनलाइन प्रणालीच्या अनुषंगाने सेवा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १,००० रुपये, सेवाविषयक प्रयोजनासाठी १,००० रुपये, तर इतर शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राकरिता १,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

बाटी आणि टीसीएसच्या सहकार्याने प्रणाली विकसित

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाटी), पुणे यांच्या सहकार्याने तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या तांत्रिक सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल तसेच WhatsApp द्वारे उपलब्ध करून देण्याची सुविधाही या प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे.

या नव्या निर्णयामुळे जात पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यासोबतच अर्जदारांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांनी यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करणे आवश्यक ठरणार आहे.

अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ : https://www.cvc.barti.in

लेखक

mnewsmarathi

M News Marathi