प्रतिनिधी
पुणे शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली चारचाकी गाडी हस्तगत करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या इर्टिंगा गाडीची किंमत सुमारे ०७ लाख रुपये आहे.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, ०५/११/२०२६ रोजी ते राहत असलेल्या अंजनी अॅब्रोस सोसायटी, वेताळनगर, येवलेवाडी-कोंढवा बु. (ता. हवेली, जि. पुणे) येथील पार्किंगमध्ये त्यांची पांढऱ्या रंगाची इर्टिंगा कार (MH-12-SF-1034) लॉक करून उभी करण्यात आली होती. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली होती. या प्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
दरम्यान, वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार प्रयत्नशील असताना, २५/११/२०२६ रोजी पोलीस अंमलदार महेश बारवकर व प्रफुल्ल मोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरीला गेलेली पांढऱ्या रंगाची इर्टिंगा कार कॅनॉल रोड, शाने गुरुजी हॉस्पिटलच्या मागे, हडपसर, पुणे येथे संशयास्पदरीत्या उभी आहे.
माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या वेळी संशयित कारजवळ एक इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने आपले नाव सतुल सुरेश राठोड (वय २५ वर्षे, रा. बुरकुलवाडी, ता. किनवट, जि. नांदेड; सध्या रा. नांदेड हॉस्पिटलजवळ, सिम्बॉयसिस कॉलेजजवळ, गुरु गोविंदसिंग कॉलनी, सुसगाव, पुणे) असे सांगितले.
गाडीबाबत त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे तांत्रिक तपासात स्पष्ट झाले. अधिक चौकशीत त्याने ही गाडी येवलेवाडी हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने पंचासमक्ष ०७ लाख रुपये किमतीची इर्टिंगा गाडी जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी येवलेवाडी पोलीस ठाण्यात जमा केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गोंहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे, सहायक फौजदार जोतीबा फुलझेले, पोलीस हवालदार परेश सावंत, महेश बारवकर, प्रफुल्ल मोरे आणि सचिन कांबळे यांच्या पथकाने केली.
