प्रतिनिधी.
बारामती, दि. २७: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्या कार्यक्षेत्रात वाहनांसाठी आकर्षक पसंती क्रमांक (चॉईस नंबर) घेण्यास वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोव्हेंबर २०२६ मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुचाकी वाहनांसाठी एमएच ४२ बीझेड, तर चारचाकी खासगी वाहनांसाठी एमएच ४२ सीए या दोन नवीन मालिका सुरू करण्यात आल्या.
दुचाकी वाहनांच्या एमएच ४२ बीझेड या मालिकेतील ८२८ पसंती क्रमांक वाहनधारकांनी आरक्षित केले. यातून नियमित शुल्क आणि लिलावाच्या माध्यमातून परिवहन कार्यालयाला एकूण ७५ लाख २९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
त्याचप्रमाणे चारचाकी खासगी वाहनांच्या एमएच ४२ सीए या मालिकेतील ४४१ पसंती क्रमांक आरक्षित करण्यात आले. यातून नियमित शुल्क आणि लिलावाद्वारे एकूण १ कोटी २१ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद, वाहन नोंदणी प्रक्रियेतील सुलभीकरण, पारदर्शक कार्यपद्धती आणि विभागातील कार्यक्षम अंमलबजावणी यामुळे हे यश मिळाले असून आकर्षक वाहन क्रमांकांसाठी नागरिकांचा वाढता कल आणि त्यातून मिळणारा महसूल यामुळे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामगिरीत भर पडली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी कळविले आहे.
