प्रतिनिधी
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जळगाव क.प., ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक २९/०३/२०२३ रोजी रात्री सुमारे ०१.२० वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर लोखंडी रॉड व इतर हत्यारांनी हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. सदर घटनेमध्ये फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी माळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील पाच आरोपींना त्याचवेळी अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अभय लक्ष्मण घोलप, रा. मेडद, ता. बारामती, जि. पुणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा पोलीस सातत्याने शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हा वारंवार राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.
सदर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी माळेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने सलग तीन महिने अथक परिश्रम घेऊन गोपनीय माहिती संकलित केली तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, सदर आरोपी हा मंचर येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच माळेगाव पोलिसांच्या पथकाने तात्काळ मंचर येथे जाऊन मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मदतीने दिनांक २७/११/२०२६ रोजी रात्री ०१.०० वाजण्याच्या सुमारास आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले.
अशा प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या फरार आरोपीचा सलग तीन महिने पाठपुरावा करून त्यास मंचर येथून ताब्यात घेण्यात माळेगाव पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी चोरीचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदीपसिंह गिल्ल सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार सो. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम सो. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, सागर पवार, धीरज कांबळे तसेच मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
