मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 29 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

नाशिकमध्ये कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा बळी; साईड पट्टीत दुचाकी घसरल्याने मिक्सरखाली चिरडून १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

mnewsmarathi 29 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,017 वाचन

प्रतिनिधी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांतील कंत्राटदाराचा गलथान कारभार एका निष्पाप तरुणीच्या जिवावर बेतला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील पपया नर्सरी परिसरात रस्त्याच्या न भरलेल्या साईड पट्टीमध्ये दुचाकी घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात श्रुती संतोष घाटोळ (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. कंत्राटदाराच्याच भरधाव सिमेंट मिक्सरखाली चिरडून तिचा दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

​नेमकी घटना काय?

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असतानाही हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. श्रुती घाटोळ आपल्या दुचाकीवरून पपया नर्सरी परिसरातून जात असताना, रस्त्याच्या कडेला असलेल्या न भरलेल्या खोलगट साईड पट्टीवर तिची दुचाकी घसरली. यामुळे दुचाकीचा तोल जाऊन ती थेट मुख्य रस्त्यावर पडली. नेमक्या त्याच क्षणी मागून येणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या भरधाव सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली ती आली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

​प्रशासन आणि कंत्राटदाराविरोधात तीव्र संताप

नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील धोकादायक साईड पट्ट्या तात्काळ भरण्यात याव्यात, यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराला वारंवार लेखी निवेदने दिली होती. मात्र, कंत्राटदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

​गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ढिसाळ नियोजन आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका १८ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi