• Home
  • इतर
  • 400 के.व्ही. हिंजवडी उपकेंद्राबाबत वर्तमानपत्रात दि. 11.04.2023 रोजी आलेल्या बातमीबाबत महापारेषणचा खुलासा
Image

400 के.व्ही. हिंजवडी उपकेंद्राबाबत वर्तमानपत्रात दि. 11.04.2023 रोजी आलेल्या बातमीबाबत महापारेषणचा खुलासा

प्रतिनिधी
हिंजवडी हा पुणे जिल्हयातील वेगाने प्रगत होत असलेला भाग आहे. तसेच पुरंदर, सासवड, जेजूरी या भागांचेही वेगाने शहरीकरण होत असल्यामुळे तेथील जमिनीचे दर ही वेगाने वाढत आहेत.


या भागातील विद्यमान व भविष्यातील संभाव्य वीज मागणीचा पुरवठा करण्यासाठी व अति उच्चदाब प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिने महापारेषण कंपनीने हिंजवडी येथे 400/220 के.व्ही. उपकेंद्र उभारण्यास ठराव क्र. 56/11, 24.08.2010 अन्वये प्रशासकीय मान्यता दिली व पुढे ठराव क्र. 62/21, दि. 09.05.2011 अन्वये त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.


उपकेंद्र व संलग्न वाहिनीचे काम सन 2012 पासून सुरु होऊन 400 के.व्ही. हिंजवडी उपकेंद्र दि. 30.05.2016 रोजी 220 के.व्ही. स्तरावर कार्यान्वित असून सध्या सुमारे 36 मेगा वॅट वीज भाराची नोंद आहे व नजिकच्या काळात सुमारे 50 मेगा वॅट वीज भार अपेक्षित आहे.
400 के.व्ही. जेजुरी – हिंजवडी या सुमारे 100 कि.मी स्रोत वाहिनीचे काम संबंधित शेतकरी व जमिन मालकांच्या तीव्र विरोधामुळे रखडले आहे. वाहिनीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यास विभागून दोन वेग-वेगळ्या कंत्राटदारांना देण्यात आले होते. तथापी, स्थानिक रहिवासी व शेतक-यांच्या तीव्र विरोधामुळे कंत्राटदारांचे काम थांबवल्यामुळे एका कंत्राटदाराने त्याबाबत न्याय मिळण्यासाठी महापारेषण विरुद्ध लवादाकडे दाद मागितली व दुस-या कंत्राटदाराने कंत्राट शॉर्ट क्लोज (Short Close) करण्याबाबत अर्ज केला आहे. महापारेषण कंपनीने शर्थीचे प्रयत्न करूनही वाहिनीचे काम पूर्ण करता आलेले नाही. सध्यस्थितीत वाहिनीचे 60% काम पूर्ण झाले आहे व त्यापैकी 11 कि.मी. वाहिनी दि. 03.11.2022 पासून कार्यान्वित केली आहे. या वाहिनीमुळे पुरंदर, भोर, बारामती, इंदापूर या तालुक्यातील ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा सुरु आहे.


तसेच, सदर वाहिनीचा काही भाग वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या जमिनीतून जात असल्याने वन विभागाची मंजूरी घेण्याची प्रक्रिया सूरु आहे.
400 के.व्ही. हिंजवडी उपकेंद्रातील 220 के.व्ही. उपकरणे कार्यान्वित करून उपयोगात आणण्यात आलेली आहेत. महापारेषणच्या संबंधित विभागाद्वारे या उपकेंद्राची नियमित देखभाल सुरु आहे. तसेच येथे मंजुर दोन्ही रोहित्रे जेजूरी व कळवा येथे कार्यान्वित करुन उपयोगात आणण्यात आलेली आहेत. त्यामुळे उपकेंद्रावर केलेला रु. 89 कोटी खर्च वाया गेला तसेच रोहित्रांचा गॅरंटी काळ विनावापर संपुष्टात आला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे जनतेच्या पैशाचे नुकसान झाले असे म्हणता येणार नाही.
अति उच्चदाब मनोरा व वाहिनीच्या तारेमुळे बाधित होणा-या जमिनीची नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याच्या कारणावरुन शेतकरी व जमिन मालकांच्या वाहिनी उभारणीस तीव्र विरोध होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे शासन निर्णय क्र. धोरण-2021/प्र.क्र. 170/ऊर्जा-4, दि. 01.12.2022 अन्वये मनोरा व वाहिनीच्या मोबदल्यासाठी सुधारित धोरण जाहिर करण्यात आले आहे.
वाहिनीच्या उर्वरित कामासाठी नविन निविदा प्रक्रिया सुरु आहे. निविदा प्रक्रियेनंतर सुधारित धोरणानुसार मोबदला देऊन वाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल.
400 के.व्ही. जेजूरी – हिंजवडी वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर 400 के.व्ही. हिंजवडीउपकेंद्र स्रोत वाहिनीद्वारे कार्यरत होईल. सदर काम पूर्ण करण्यासाठी संबंधित शेतकरी व जमिन मालकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

डॉ. मिलिंद आवताडे
जनसंपर्क अधिकारी, महापारेषण
मोबाईल-८८७९४६५३७७

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025