प्रतिनिधी
(दि. २९.०८.२०२३) सध्याचे युग हे उद्योग आणि उद्योजकांचे असून प्रत्येक महाविद्यालयातून उद्योजक तयार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ऑर्गानिसिस नीरा जुबिलन्ट येथील मनुष्यबळ विभागाचे प्रमुख माननीय दीपक सोनटक्के यांनी केले. ते मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथील वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “आजच्या युगात उद्योजकाचे महत्व” या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे उपस्थित होते.
‘आजच्या युगात प्रत्येक कंपनीला कौशल्ये, गुण आणि बुद्धिमत्ता यांनी परिपूर्ण युवकांची गरज असून त्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच महाविद्यालयांच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी आवश्यक तो प्रतिसाद देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांकडे किमान बुद्धिमत्ता, कौशल्ये आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे तरच ते यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय करून आपल्या हाताखाली इतर लोकांना नेमता येईल अशी क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे यांनी सांगितले की, प्रत्येक महाविद्यालयांमध्ये आता कंपन्यांमध्ये विविध पदावर काम करणाऱ्या आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यांची प्राध्यापक ‘Professor in Practice’ म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने केली असून त्यामुळे उद्योगांना आवश्यक असणारी किमान कौशल्य महाविद्यालयातच शिकवली जाणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना भविष्यकाळात तयार मनुष्यबळ मिळणार आहे. ही नवीन शैक्षणिक धोरणाची जमेची बाजू आहे.
याप्रसंगी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 117 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर जवाहर चौधरी आणि क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर बाळासाहेब मरगजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका पूजा ढोणे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राहुल खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका मोनाली जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रणजित कुंभार यांनी केले. कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समीतिच्या सदस्या प्रा. सुजाता भोईटे, उपप्राचार्या डॉ. जया कदम, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. प्रवीण ताटे- देशमुख, आर. एस. जगताप वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक वर्ग उपस्थित होते.