प्रतिनिधी
पुण्याच्या आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दासोपंत उंडाळकर वय- ५२ याला अटक केली आहे. या घटनेतील तीनही मुले अल्पवयीन आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी हा अनैसर्गिक अत्याचार करत होता. अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थाचालक कमी आणि शिक्षक म्हणून वावरणाऱ्या दासोपंत याने आपल्याच विद्यार्थ्यांना वासनेची शिकार बनवलं आहे. तो ज्या संस्थेचा संस्थाचालक आहे तिथे ७० मुले वारकरी शिक्षण घेतात. पैकी, गेल्या १५ दिवसांपासून तीन अल्पवयीन मुलांना एकांतात बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलांनी त्यांच्या पालकांना ही बाब सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी दासोपंत उंडाळकर याला अटक केली आहे. संस्थेतील इतर मुलांची देखील काळजीपोटी विचारपूस करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.