पनवेलमधील भारतनगर झोपडपट्टीत राहणा-या बांगलादेशीय नागरिकांना ताब्यात घेतले

क्राईम

प्रतिनिधी

पनवेल शहरात बांगलादेशी नागरिक अवैध वास्तव्य करत असल्याची तक्रार पोलिसांकडे लेखी स्वरुपात सकल हिंदू संघटनेने केली होती. पोलिसांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत तातडीने सर्वत्र शोधमोहीम हाती घेतल्यावर चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पनवेल शहर पोलीस व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या खास पथकाने ही कारवाई केली.

पनवेल शहरामध्ये राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी झालेल्या वादामध्ये बाहेरुन आलेले आणि भारतीय नागरिकत्व नसलेल्या व्यक्तीकडून ही मारहाण झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र या व्यक्तींना भारतनगर झोपडपट्टीत आश्रय मिळत असल्याची तक्रार सकल हिंदू संघटनेच्यावतीने निलेश पाटील यांनी केला होता. पोलीस विभाग आणि पनवेल महापालिकेकडे लेखी निवेदनातून पाटील यांनी लक्ष वेधले होते. पोलिसांनी या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पळस्पे येथे केलेल्या कारवाईत चौकडीला ताब्यात घेतले.

या चौघांकडे अधिक चौकशी केल्यावर ही चौकडी भारतनगर झोपडपट्टीत राहत असल्याचे समोर आले. ताब्यात घेतलेल्यांची नावे सामीउल बीरु काझी, मुबारक हाशीमअली गाझी, इक्राम बादशाह शेख, रसल बाबुल शेख अशी आहेत. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी यांच्यावर पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम ३ (अ), १२ (क) सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम (१४ (अ) प्रमाणे कारवाई केली आहे. खाडीक्षेत्रावर भराव घालून भारतनगर झोपडपट्टी उभारण्यात आली असून या झोपडपट्टी परिसरातून बांगलादेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य उजेडात आल्याने महापालिका व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम हाती घेऊन प्रत्येक झोपडीत नेमके कोण राहतंय, त्यांचे मूळगावाची चौकशी करुन अवैध वास्तव्याचा छडा लावण्याची मागणी होत आहे.