प्रतिनिधी
एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या (single use plastic-SUP)केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या, अशा प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन, विक्री, साठा आणि वितरण, तसंच या प्लास्टिकची आयात आणि वापर यावर पूर्ण बंदी घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 12 ऑगस्ट 2022 रोजी अधिसूचना जारी केली होती. या वस्तूंमध्ये, कटलरी(कातर,चाकू, सुरी यासारख्या गृहोपयोगी कापण्या साठी वापरली जाणारी उपकरणं किंवा हत्यारं) आवरणासाठी आवश्यक असलेल्या पातळ फिती, आईस्क्रीम-कँडी यात आधार म्हणून वापरले जाणारे कप,चमचे,काड्या, कांड्या यांचा समावेश आहे.

ही बंदी 01 जुलै 2022 पासून लागू करण्यात आली आहे.या बंदीची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधितांना सर्वंकष असे निर्देश जारी केले होते. या प्लास्टिक उत्पादक कंपन्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबवण्याचे निर्देश पुरवठादारांना देण्यात आले होते. त्याचबरोबर या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर आणि या वस्तूंची ऑनलाईन विक्री थांबवण्याचे निर्देश, ई- वाणिज्य कंपन्यांना सुद्धा जारी करण्यात आले होते. या प्लास्टिकला पर्याय ठरेल असं इतर उत्पादन घेण्यासाठी एम एस एम ई म्हणजेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना प्रशिक्षण देण्यासारख्या उपाययोजना सुद्धा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं या कालावधीमध्ये हाती घेतल्या होत्या.
ही बंदी आणि या बंदीची अंमलबजावणी यासंदर्भातल्या घडामोडींवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी, सिंगल यूज प्लास्टिक बाबत सार्वजनिक तक्रारींची नोंद घेणारं अॅप आणि सिंगल यूज प्लास्टिक बंदी वर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीनं संकेतस्थळ अशा डिजिटल माध्यमांचाही उपयोग करण्यात आला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांच्या सहकार्यानं जुलै-ऑगस्ट 2022 या कालावधीत महत्त्वाची व्यापारी आस्थापनं आणि दुकानांमध्ये जाऊन तपासणी करण्याच्या मोहिमा सुद्धा राबवल्या.या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 17 ऑक्टोबर 2022 पासून एक विशेष मोहीम सुद्धा सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पन्नास हून जास्त पथकं तैनात करण्यात आली आहेत. ही पथकं सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी, फुल विक्रेते, पदपथांवरचे विक्रेते, फिरते विक्रेते, भाजी बाजार, मासळी बाजार, घाऊक बाजारपेठा, यासारख्या ठिकाणी जाऊन तपासणीचं काम करतात.
या तपासणी मोहिमा सुरु झाल्या असून त्यात राज्यांच्या नगर विकास विभागाचे अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांना सुद्धा अशा प्रकारच्या मोहिमा राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.17 ते 19 ऑक्टोबर 2022 दरम्यान राबवण्यात आलेल्या या अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये एकूण 20 हजार 36 तपासण्या करण्यात आल्या, त्यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांनं केलेल्या 6 हजार 448 तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्यांमध्ये नियम उल्लंघनाची 4 हजार प्रकरणं आढळून आली, तर नियमभंग करणाऱ्या, एकूण 2 हजार 900 जणांना दंडवसुलीच्या पावत्या(चलन) जारी करण्यात आल्या. या मोहिमांमधून, संबंधित यंत्रणांनी, सुमारे 46 टन वजनाच्या सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्या आणि 41 लाख रुपयांचा दंड वसूल केला.या सर्व उपक्रमांमधून सिंगल यूज प्लास्टिकच्या चीज वस्तूंची बाजारपेठांमधली पुरवठा साखळी तोडण्यासाठी (पुरवठा थांबवण्यासाठी) सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे. सिंगल यूज प्लास्टिकचं उत्पादन आणि विक्रीमध्ये सहभागी असलेले घाऊक आणि किरकोळ व्यापारी, तसंच छोटे-मोठे कारखाने शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि या तपासणी मोहिमांमधून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिकच्या चीजवस्तू जप्त करण्यात आल्या.
सिंगल यूज प्लास्टिक आणि या प्लास्टिकच्या चीजवस्तू यांचा एका राज्यांमधून दुसऱ्या राज्यांमध्ये पुरवठा होऊ नये यासाठी आंतरराज्य सीमांवर सुद्धा या मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत.समाजातल्या सर्व स्तरांमधून तसंच अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्र आणि घटकामधून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबावा, सिंगल यूज प्लास्टिकचं पूर्णपणे निर्मूलन व्हावं, यासाठी येणाऱ्या काळात सुद्धा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तपासणी मोहिमा अधिक तीव्र करणार आहे.