राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी स्वीकारला पदभार

Uncategorized

प्रतिनिधी.

मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सहकार विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक अमित सैनी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

श्री.सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कोलकाता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, वित्त अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.