प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचे तालुका कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. खरीप हंगामातील बाजरी,भुईमूग, सोयाबीन, तूर व कांदा या अधिसूचित पिकांसाठी महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. त्यासाठी जमिनीचा ७/१२, आधारकार्ड, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र तसेच ई-पीक पाहणी ॲप वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी एच.डी.एफ.सी. इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे टोल फ्री क्रमांक (१८००२६६०७००), जिल्हा मध्यवर्ती सहकारी, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बारामती तसेच जवळच्या महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र व सी.एस.सी. केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.