सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ई-मेलद्वारे दिलेले शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची रंगीत प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी पुरविण्यात आलेले ओळखपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅग आणू नयेत. बॅग व त्यातील वस्तू गहाळ अथवा चोरीस गेल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.लेखी परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा.

पोलीस भरतीमध्ये कोणत्याही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असून असे आढळून आल्यास लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड यांच्या ०२११७- २६२३४७ किंवा ७२७६७६८३४७ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.mahapolic.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.