प्रतिनिधी.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी देण्यात येवून कारागृहातून मुक्त करण्याच्या योजनेंतर्गत स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना मुक्त करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२२ पासून तीन टप्प्यात एकूण ५८१ बंद्यांना मुक्त करण्यात आले आहे.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी मुक्त होणाऱ्या सर्व बंद्याना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी आवाहन केले व नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माफी योजनेचा उद्देश हा बंद्यांमध्ये कारागृहातील शिस्त व आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे. राज्यातील कारागृहातून पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ बंदी, दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ बंदी तर तिसऱ्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ बंदी असे एकूण संपूर्ण राज्यातील कारागृहातून विशेष माफी अंतर्गत एकूण ५८१ बंदी मुक्त करण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तिसऱ्या टप्प्यातील विशिष्ट प्रवर्गातील ७ शिक्षा बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यात आले. या बंद्यांचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांनी समुपदेशन केले. तसेच या बंद्यांकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्यावतीने विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील ॲङ प्रीतम शिंदे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
राज्यातील कारागृहनिहाय विशेष माफी योजने अंतर्गत (तिसरा टप्पा)मुक्त झालेली बंदी संख्या: येरवडा मध्यवर्ती कारागृह- १६, येरवडा खुले कारागृह- १, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह- ३४, ठाणे मध्यवर्ती कारागृह- १, नागपूर मध्यवर्ती कारागृह- २३, अमरावती खुले कारागृह- ५, अमरावती मध्यवर्ती कारागृह- १९, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह- ५, कोल्हापूर खुले कारागृह- ५, जालना जिल्हा कारागृह- ३, पैठण खुले कारागृह- २, औरंगाबाद खुले कारागृह- २, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह- २४, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह- १३, मुंबई मध्यवर्ती कारागृह- ७, तळोजा मध्यवर्ती कारागृह- ८, अकोला जिल्हा कारागृह- ६, भंडारा जिल्हा कारागृह- १, चंद्रपूर जिल्हा कारागृह- २, वर्धा जिल्हा कारागृह- २, वर्धा खुले कारागृह- १, वाशीम जिल्हा कारागृह- १, मोर्शी खुले कारागृह अमरावती- १, गडचिरोली खुले कारागृह- ४.