प्रतिनिधी
*सोमेश्वरनगर :* येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून परिसरातील निंबुत गावचे सुपुत्र व नुकत्याच एमपीएससी परीक्षेमध्ये टाऊन प्लॅनिंग ऑफिसर या पदासाठीच्या परीक्षेत यश संपादन केलेले श्री. अमरजीत सतीश लकडे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना वेळेचे उत्तम नियोजन, अभ्यासामध्ये सातत्य, चांगल्या मित्रांची संगत, स्वत्वाचा शोध व चिकाटी या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. कोणत्याही अपयशाने खचून न जाता जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थी घडत असताना विद्यार्थीदशेत त्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. पुस्तकांशी अधिक मैत्री करावी, वाचन वाढवावे व कोणतीही शाश्वत गोष्ट मिळविण्यासाठी कष्टाला पर्याय नाही असा संदेश उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. सतीशराव काकडे देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच यावेळी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. संजू जाधव, डॉ. गेनू दरेकर, डॉ. कल्याणी जगताप, डॉ. निलेश आढाव, डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. अनिकेत भोसले, प्रा. दत्तात्रय जगताप, प्रा. गोरख काळे, प्रा. संतोष शेळके, प्रा. पोपट जाधव, प्रा. नामदेव जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा केंद्र व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. नारायण राजूरवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व डॉ. राहुल खरात यांनी आभार मानले.