महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

Uncategorized

प्रतिनिधी.

पुणे, दि. २४: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडील स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या लाभासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी २० टक्के बीज भांडवल कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना तसेच थेट कर्ज व्याज परतावा (एक लाख रुपयांपर्यंत) अशा विविध योजना राबविण्यात येतात.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांस बँकेमार्फत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत देशातंर्गत अभ्यासक्रमासाठी १० लाख तर परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाख, गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत बँकेमार्फत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था आदींना व्यवसायासाठी १५ लाखापर्यंतचे कर्ज वितरित करण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँककडून घेतलेल्या कर्जाचे १२ टक्के पर्यंतचे व्याज महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला आहे.

थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत लाभार्थ्यांस व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंत कर्ज वितरित करण्यात येते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज अदा करावे लागत नाही.

योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. बी, स.नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.