‘बंटी बबली’ पोलिसांच्या जाळ्यात, खामगावातील एकाला घातला होता गंडा

क्राईम

प्रतिनिधी

 खामगाव येथील एकाची दोन लाख 4 हजार रुपयांनी ‘ऑनलाईन’ फसवणूक करणाऱ्या मध्यप्रदेशातील ‘बंटी- बबली’ला बुलढाणा सायबर पोलिसांनी गजाआड केले! चंदा मनोज सोळंकी (४२, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) अशी आरोपींची नावे आहे. खामगाव येथील दाल फैलमध्ये रहाणारे जय रविंद्र किलोलिया यांनी या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

१२ ऑक्टोबर रोजी त्यांना ‘जीमेल अपडेट’ करण्याच्या बहाण्याने एक फोन आला होता. सोबतच ‘व्हॉटस्अप’वर त्यांना एक लिंक टाकण्यात आली होती. त्याद्वारे आरोपींनी किलोलिया यांच्या ॲक्सीस बँकेच्या खात्यातून २ लाख ४ हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासाची चक्रे फिरविली. तांत्रिक माहिती संकलित केली. सायबर पोलिस ठाण्याचे सायरा शाह, शकील खान, कुणाल चव्हाण, राजदीप वानखडे, विक्की खरात, संदीप राऊत यांच्या पथकाने तपास केला. आरोपी चंदा मनोज सोळंकी, तरुण पंकज खरे यांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना खामगाव न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.