साताऱ्यात काही दहशतवादी असल्याचा पोलिसांना दूरध्वनी, संशयीत पोलिसांच्या ताब्यात

क्राईम

प्रतिनिधी

कुलाबा येथील हॉटेल ताजमध्ये १० ते ११ पाकिस्तानी दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाल्याची घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातही दहशतवादी असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आला. याप्रकरणानंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली. दूरध्वनी करणाऱ्याच शोध घेतला.

साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार आहे. खूप मोठे काही तरी घडणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झाला. रडारच्या माहितीमुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तातडीने गुन्हे शाखा व रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळविण्यात आली. दूरध्वनी करणाऱ्याला ताब्यात घेऊन टिळक नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी संशयीताची चौकशी केली असून त्याच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला होता. सात वर्षांपूर्वी संशयीत व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तेव्हापासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे संशयीत व्यक्तीच्या जावयाने पोलिसांना सांगितले. संशयीत व्यक्ती मुंबईमध्ये बहिणीकडे वास्तव्याला आहे.

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला हॉटेल ताजमध्ये १० ते ११ दहशतवादी शिरल्याचा गुरूवारी दूरध्वनी आला होता. याबाबत कुलाबा पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर तात्काळ बीट मार्शल व त्यांच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने हॉटेलमध्ये जाऊन तेथील सुरक्षा प्रभारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्वांनी मिळून हॉटेलची पूर्णपणे तपासणी केली. पण काहीच आढळले नाही. याप्रकरणानंतर गुन्हे शाखा व इतर यंत्रणांना माहिती देण्यात आली असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.