प्रतिनिधी
खार येथील एका कुटुंबात काम करणाऱ्या दोन नोकरांनी जेवणातून गुंगीचे औषध मिसळून घरातील ५० लाख रुपयांच्या मौलवान दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
तक्रारदार सुनीता विजय झवेरी (५३) या आपल्या १९ वर्षांच्या मुलीसोबत खार (पश्चिम) येथील रस्ता क्रमांक १४ परिसरात राहतात. त्याचे पती व्यवसायाने सराफ होते. त्यांचे नोव्हेंबर २०२३ मध्ये निधन झाले. झवेरी यांच्या निवासस्थानी राजा यादव उर्फ निरज (१९) आणि शत्रुघ्न कुमार उर्फ राजू (१९) हे दोघे गेल्या काही दिवसांपासून कामाला होते. झवेरी यांच्या घरी यापूर्वी काम करणारा चालक संतोष रॉय याच्या शिफारशीवरून त्यांना कामावर ठेवले होते. दोघे स्वयंपाकघरात राहायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी झवेरी यांचा स्वयंपाकी मुकेश सिंह जेवण तयार करून निघून गेला.
झवेरी, त्याची मुलगी, त्यांच्या पतीची ६५ वर्षांची बहीण आणि त्यांची मोलकरीण नलिनी पाटील हे रात्री ९ वाजता जेवले. जेवण झाल्यानंतर त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता सर्वजण उठले. त्यावेळी घरातील सर्व खोल्यांमधील वस्तू विखुरलेल्या होत्या. तसेच हिऱ्यांचे दागिने गायब झाले होते. घरातील सर्वांना उलट्या होऊ लागल्या. त्यांनी घरात नीरज व राजूचा शोध घेतला. त्यावेळी ते स्वयंपाकघरात नव्हते. त्यामुळे त्यांनीच गुंगीचे औषध अन्नपदार्थांमध्ये मिसळून घरात चोरी केल्याचा संशय झवेरी यांना आला.
या घटनेनंतर झवेरी यांनी मुलाला बोलावले, त्यानंतर या चौघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी झवेरी यांचे रुग्णालयात जबाब नोंदवले आणि निरज आणि राजूविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींविरोधात भादंवि कलम ३२८ (गुंगीकारण वस्तू देणे ), ३८१ (नोकराकडून चोरी) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.