प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात एका महिलेने न्यायालयात एका विनयभंगाच्या आरोपीविरोधात साक्ष देऊ नये म्हणून तिला घाबरवण्यासाठी आरोपीने महिलेचा चक्क वेगवेगळ्या पद्धतीने विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आहे.
शरफराज तनवीर शेख सत्तार (४०) रा. लकडगंज असे आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मी (बदललेले नाव) असे ३७ वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. लक्ष्मीचा आरोपी शरफराज याने यापूर्वीही एकदा अश्लिल चाळे करत विनयभंग केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात महिलेने आरोपीविरूद्ध न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून २० ऑक्टोंबर २०२३ पासून ३ एप्रिल २०२४ पर्यंत आरोपी सातत्याने महिलेला त्रास देणे सुरू केले.
आरोपीने महिलेला घाबरवण्यासाठी ती घरी असतांना दगडाने तिच्या घरातील खिडकीचे काच फाडत होता. सातत्याने महिलेमध्ये भिती निर्माण करण्यासाठी तिचा पाठलाग करत होता. बदनामीची धमकी देण्यासाठी वारंवार महिलेच्या घरा जवळच्या भिंतीवर घाणेरडे लिहून ठेवत होता. वारंवार लक्ष्मीच्या घराजवळ जाऊन अश्लिल इशारे करून तिला जिवे मारण्याची धमकीही देत होता. आरोपीची हिंमत वाढतच असल्याचे बघत तिने शेवटी लकडगंज पोलीस ठाणे गाठून पुन्हा आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.