प्रतिनिधी
औषध विक्रीचा परवाना नसतानाही कल्याण भिवंडी रोडवरील आरव आय रुग्णालयाच्या औषध दुकानात बेकायदा औषध विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ९ फेब्रुवारी रोजी धाड टाकून ८५ हजार ३२५ रुपये किमतीची विविध ९१ प्रकारची औषधे जप्त केली.
कल्याण – भिवंडी रोडवरील भिवंडी येथील डॉ. अश्विन बाफना यांच्या मालकीच्या आरव आय दवाखान्यात विनापरवाना औषध विक्री होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली. त्यानुसार गुप्तवार्ता विभाग व ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी रोजी औषध दुकानाची तपासणी केली. यावेळी औषध निरीक्षकांनी दुकानामधील उपस्थित व्यक्तीकडे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम १९४५ अनुषंगाने परवानाबाबत विचारणा केली. यावर औषधाच्या दुकानात असलेल्या व्यक्तींने आपण फार्मासिस्ट असून आपल्याकडे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडून प्राप्त नोंदणीकृत प्रमाणपत्र असल्याचेही सांगितले. मात्र औषध निरीक्षकांनी परवानापत्र दाखविण्याची सूचना केल्यानंतर त्याने आपण फार्मासिस्ट नसून आपल्याकडे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ॲलोपॅथी औषधांची डॉक्टरांच्या चिठ्ठीद्वारे परवानाधारक औषध विक्री दुकानातूनच विक्री करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या रुग्णालयाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.
औषध निरीक्षकांनी उपलब्ध औषध साठ्यातून चाचणीसाठी औषधांचे नमुने घेऊन उर्वरित ८५ हजार ३२५ रुपये किमतीची औषधे जप्त करण्यात आली. तसेच औषध निरीक्षकांनी ९ फेब्रुवारी रोजी विक्री केलेल्या औषधांची देयके व त्यापूर्वीच्या देयकांच्या प्रती ताब्यात घेतल्या. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाचे औषध निरीक्षक वि. आर. रवि, शशिकांत यादव व ठाणे कार्यालयातील औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी केली.