प्रतिनिधी
यवतमाळ येथील जामनकरनगरात विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यविधीसाठी अंत्ययात्राही काढण्यात आली. मात्र डायल ११२ वर विवाहितेच्या मृत्यूची तक्रार प्राप्त होताच, पोलीस चौकशीत अखेर सत्य बाहेर आले. पतीनेच कौटुंबिक वादात पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दीपाली मिश्रा (२८) रा. जामनकरनगर, यवतमाळ असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन मिश्रा (३४) असे मारेकरी पतीचे नाव आहे.
एखाद्या चित्रपटास शोभावी अशी ही घटना शहरात घडली. आरोपी महेश हा मृतक दिपालीचा दुसरा पती आहे. या दोघांना दोन मुले आहे. महेशने गुरुवारी दीपालीचा मृत्यू झाल्याचे तिच्या दारव्हा तालुक्यातील वारज येथील आत्या रत्नकला शंकर तिवारी (७४) यांना फोन करून सांगितले. दीपाली हिची वारज येथील मैत्रिण अश्विनीच्या मोबाइलवरून हा संवाद झाला. भाचीच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच आत्या दुपारी यवतमाळ येथील जामनकरनगरातील दीपालीच्या घरी आली. यावेळी महेशला आत्याने दीपालीच्या मृत्यूबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने दीपालीच्या छातीत दुखत होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र दीपालीच्या आत्याला महेशच्या बोलण्यावर संशय आला. त्याठिकाणी महेशची मावशी चंदा तिवारी, पुष्पा चौधरी दोघीही रा. लोहारा या आल्या. त्यांनी सुद्धा मृत्यूबाबत विचारले असता महेशने छातीत दुखत होते, असेच सांगितले. मृतक दिपालीला आंघोळ घालत असताना गळ्यावर आणि कपाळावर काळ्या खुणा दिसल्या. त्यामुळे पुन्हा महेशला विचारणा केली असता त्याने दीपाली बाजीवरून खाली पडली होती, असे सांगितले. परंतु गळा आवळल्यासारख्या खुणा दिसत असल्याने संशय आला.
दीपालीच्या मृत्यूची वार्ता ऐकून परिसरातील नागरिक घराजवळ रात्री दीड वाजता भांडण झाले होते, मोठमोठ्याने आवाज येत होता, मुलांना विचारले असता त्यांनी मम्मी व पप्पाचा वाद झाला होता, अशी माहिती दिली. गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दीपालीचा अंत्यविधी करण्यासाठी अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र याचवेळी डायल ११२ वर कॉल आला. त्यावर मृतक दीपाली मिश्रा हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे अवधूतवाडी पोलीस घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. बाजोरियानगरात अंत्ययात्रेला थांबवून परत घरी नेले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. रात्री उशीरा दीपाला शवविच्छेदन अहवाल आला. त्यामध्ये आवळून हत्या झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे विवाहितेच्या मृत्यूचे गूढ उकलले. तसेच दीपालीची आत्या रत्नकला तिवारी यांनी देखील महेशने दीपालीची गळा आवळून हत्या केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी महेशविरुद्ध गुन्हा नोंद करीत त्याला अटक केली. या घटनेमुळे या दाम्पत्याची दोन चिमुकली मुले उघड्यावर आली.