प्रतिनिधी
पुण्यातील खराडी भागातील तुकारामनगर भागात पार्किंगच्या वादातून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेतील मुख्य आरोपी धीरज सपाटे (वय २५) हा पसार झाला आहे. आकाश सोदे (वय २३),नयत गायकवाड (वय १९), सूरज बोरुडे (वय २३), विशाल ससाने (वय २०) या चार आरोपींना चंदननगर पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी धीरज सपाटे आणि फिर्यादी महेश राजे हे खराडी येथील तुकारामनगर येथे राहण्यास आहेत. मागील काही दिवसापासून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पार्किंगवरून वाद सुरू होता. आरोपी धीरज सपाटे हा काल त्याच्या मित्रासोबत फिर्यादी महेश राजे यांच्या घरासमोरील चार चाकी वाहनांवर लाकडी दांडक्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली.
घराबाहेर काय गोंधळ सुरू आहे. हे पाहण्यास फिर्यादी महेश राजे यांच्या भाडेकरू वर्षा गायकवाड आल्यावर, त्यांच्या अंगावर आरोपी धीरज सपाटे याने पेट्रोल टाकले. तेवढ्यात वर्षा गायकवाड या तेथून पळून गेल्या. त्या घटनेनंतर आसपासचे नागरिक जमा झाले. त्या सर्वांना आरोपी धीरज सपाटेने, जर यामध्ये कोणी आलं तर सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. या एकूणच घटनेची हकिकत फिर्यादी महेश राजे यांनी दिली. त्यानुसार मुख्य आरोपी धीरज सपाटे, आकाश सोदे, नयत गायकवाड, सूरज बोरुडे, विशाल ससाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुख्य आरोपी पसार असून अन्य चार आरोपींना अटक करण्यात आल्याचं चंदननगर पोलिसांनी सांगितले.