भरधाव कारने पाच वर्षीय मुलाला चिरडले

क्राईम

प्रतिनिधी

नागपुर शहरातील रस्ते अपघातांवर वाहतूक पोलिसांना नियंत्रण मिळविण्यावर अपयश येत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. नवीन घटनेत एका भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या पाच वर्षीय मुलाला धडक दिली. त्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सीआरपीएफ कार्यलयाच्या प्रवेशद्वार क्रमांक दोनसमोरील रोडवर घडली. कृष्णा पवन यादव (५, डिगडोह) असे मृत मुलाचे नाव आहे.

पवन यादव हे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. रविवारी सकाळी पवन हे पत्नी आणि मुलगा कृष्णा यांच्यासोबत गॅस सिलिंडर आणायला दुचाकीने गेले होते. सिलिंडरसाठी काही पैसे कमी पडत असल्यामुळे पत्नी कृष्णासह एटीएमकडे जात होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने मुलाला जबर धडक दिली. या धडकेत कृष्णाच्या डोक्याला जबर मार लागला. अपघात होताच मोठी गर्दी झाली. काही नागरिकांना कारचालकाला थांबवले. त्याने दवाखान्याचा खर्च करण्याची हमी देऊन जखमी कृष्णाला कारमध्ये घालून वानाडोंगरीतील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना पळ काढला. तेथून कृष्णाला मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पवन आणि राणी यांना दोन मुले आहेत. मुलाचा अपघात झाल्यानंतर कारचालकाने उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवून खासगी रुग्णालयात दाखल केले व नंतर पळ काढला. आर्थिक अडचणीत असलेल्या दाम्पत्याला खर्च झेपत नसल्यामुळे जखमी मुलाला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोपी यादव दाम्पत्याने केला आहे.