प्रतिनिधी
फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यानंतर महिला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली.
सादिया सिद्दीकी (वय ३५) असे पसार झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सादियाविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तिचा शोध घेतला. सादीया हरियाणात रवाना झाली. तिला अटक करण्यात आली. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून सादियाला घेऊन सायबर पोलीस ठाण्याचे पथक रेल्वेतून पुण्याकडे निघाले. राजस्थानातील कोटा परिसरातील नागदा स्थानकाजवळ रेल्वे सिग्नलसाठी थांबली होती. पोलिसांना गुंगारा देऊन सादिया रेल्वेतून पसार झाली.
दरम्यान, गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मार्शल लिलाकर याला अटक केली होती. मार्शलला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याने छातीत दुखत असल्याची बतावणी केली. मार्शलला घेऊन सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी ससून रुग्णालयात तपासणीसाठी आले. त्यावेळी मार्शल पोलिसांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातून पसार झाला. पसार झालेल्या मार्शलला पुन्हा येरवडा भागातून अटक करण्यात आली.