क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले

क्राईम

प्रतिनिधी

उपराजधानीत हत्यासत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. इमामवाड्यात किरकोळ वादातून बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता जातरोडीत घडली. महेश विठ्ठल बावणे (२३, जाततरोडी क्र.३, इंदिरानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेरूदादा ऊर्फ शंकर भोलासिंग राठोड (५२, जाततरोडी क्र.३) आणि रितिक शंकर बावणे (२१) अशी आरोपी बापलेकांची नावे आहेत.

महेश बावणे याचे वडिल रेल्वे विभागात नोकरी होते. त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने अनुकंपा तत्वावर महेश हा नोकरीवर लागला होता. त्याचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. गुरुवारी त्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने बुधवारी रात्री त्याच्या घरी गर्दी होती. त्याच्या पत्नीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी वस्तीतील अनिषा इंगोले ही तरुणी घरी आली होती. आरोपी शेरू राठोड याचा व्याजाने पैसे वाटण्याचा धंदा असून त्याने अनिषाच्या आईला काही कर्ज दिले होते. अनिषाला बघताच शेरूने तिला शिवागाळ करीत पैशाची मागणी केली. ‘तुझ्या आईने पैसे घेतल्यानंतर ती फोन उचलत नाही. जर व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाही तर बघून घेईल,’ अशी धमकी दिली. दारात येऊन शिविगाळ करणाऱ्या शेरूला महेशने हटकले. कार्यक्रम असल्यामुळे पाहुणे आले आहेत, त्यामुळे शिवीगाळ करू नको.’ अशी तंबी दिली. त्यामुळे चिडलेल्या शेरू धावतच घरात गेला.

त्याने मुलगा रितिक यालाही सोबत आणले. बापलेकांनी महेशला मारहाण केली. त्यानंतर रितिकने महेशचे दोन्ही हात पकडले तर शेरूने महेशच्या छातीत चाकू भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात महेश पडल्यानंतर बापलेकांनी पळ काढला. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी जखमी महेशला मेडिकल रुग्णालयात नेले. काही वेळातच महेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी शेरू आणि रितिकवर गुन्हा दाखल केला.

शेरूने २०१७ मध्ये इमामवाड्यात खून केला आणि त्यात तो निर्दोष सुटला होता. तेव्हापासून तो वस्तीत व्याजाने पैसे वाटपाचा धंदा करीत होता. महेशचा खून केल्यानंतर तो नंदनवनमधील एका पुलाखाली लपला होता. युनिट चारचे अधिकारी अयुब संदे, अविनाश जायभाये, सुनील ठवकर, केतन पाटील आणि संदीप मावलकर यांनी शेरूला सापळा रचून अटक केली. तर मुलगा रितिक हा अद्याप फरार आहे.