रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध

क्राईम

प्रतिनिधी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील महिलेचे सात तोळ्यांचे दागिने रिक्षात विसरल्याची घटना घडली. पोलिसांनी त्वरित तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे रिक्षाचालकाचा माग काढला. रिक्षात विसरलेले दागिने महिलेला परत मिळवून दिले.

मुंबईहून प्राजक्ता सचिन महाडिक (वय ४०) या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यात आल्या होत्या. विवाह समारंभ आटोपून त्या कुटुंबीयांसोबत रिक्षातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. गडबडीत त्या दागिने ठेवलेली पिशवी रिक्षात विसरल्या. दागिने गहाळ झाल्यानंतर त्या घाबरल्या. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्यात त्या गेल्या. त्यांनी दागिने गहाळ झाल्याची तक्रार सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांना दिली. त्यानंतर पोलीस हवालदार प्रवीण पासलकर यांनी त्वरीत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले.

चित्रीकरणात रिक्षाचालकाचा वाहन क्रमांक मिळाला. पासलकर यांनी तातडीने वाहन क्रमांकावरुन रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाला महाडिक यांची पिशवी परत आणून देण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षाचालक पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने दागिने ठेवलेली पिशवी पोलिसांना दिली. पोलिसांनी महाडिक यांच्यासमोर पिशवी उघडली. महाडिक यांचे सात तोळ्यांचे दागिने पिशवीत होते. दागिने परत मिळाल्यानंतर महाडिक यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. त्यांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले.