प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकनिमित्त जिल्ह्यातील परवानाधारक अग्नीशस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा एक भाग म्हणून या कार्यवाहिकडे पाहिले जाते. आचारसंहिता लागता क्षणी ही कारवाई सुरू करण्याचे निर्देश आहे. गृह विभागाचे परिपत्रक, यासंदर्भातील ४१७१/२०१४ ही विजय पाटील व शीतल पाटील विरुद्ध सरकार ही जनहित याचिका( रिट पिटीशन) , उच्च न्यायालयाचा १० जुलै २००९ रोजीचा निकाल आणि निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश लक्षात घेऊन जिल्हा छाननी समिती कोणाची अग्नीशस्त्रे जमा करायची याचा निर्णय घेते.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा प्रमुख समावेश असलेली समिती सर्व ठाणेदारांना जमा करण्याचे निर्देश देते. प्रामुख्याने निवडणूक काळातील दंगलीत थेट सहभागी, गुन्हे दाखल झालेले या वर्गवारीतील परवानाधारकांची अग्नीशस्त्रे जमा करून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांचे पोलीस रेकॉर्ड देखील पाहण्यात येणार आहे. यामुळे राजकारण्यांना या कारवाईची फारशी झळ पोहोचणार नाही. तसेच बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षक यांची अग्नीशस्त्रे जमा करण्यात येणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
बुलढाणा जिल्ह्यात ही कार्यवाही सुरू झाली आहे. पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही अग्नीशस्त्रे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ७ दिवसांनी परत देण्यात येणार आहे. ११ जुननंतर ही कारवाई होईल. जिल्ह्यातील परवाना धारक अग्नीशस्त्र संख्या ६०५ इतकी आहे. यामध्ये प्रामुख्याने १३ बोअर चे पिस्टल आणि हॅन्डगन चा समावेश आहे. सर्वसामान्य या दोघा शस्त्राना सारखे समजतात. मात्र,या दोन्हीमध्ये फरक आहे. आकाराने लहान व हातात सहज मावते ती हँडगन होय.