प्रतिनिधी
पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडाळे चौक परिसरात अडीचच्या सुमारास टोळक्याने बांबू आणि कोयत्याचा वापर करून तब्बल १५ दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस चव्हाण या तरुणाचा काही दिवसांपासून आरोपींसोबत वाद सुरू होता. बुधवारी मध्यरात्री टोळक्याने क्रिसला अडवून त्याच्याशी बाचाबाची केली. वाद वाढल्यानंतर टोळक्याने त्याला मारहाण केली. क्रिस तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. याचवेळी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. अचानक झालेल्या आरडाओरड आणि वाहन फोडण्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिपक कदम याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शीचीही माहिती घेतली जात आहे.
पद्मावती परिसरात वाहन तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये तळजाई वसाहतीत अल्पवयीन टोळक्याने चार वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.















