सोमेश्वर नगर प्रतिनिधी.
_विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारा प्रेरणादायी उपक्रम_
सोमेश्वरनगर (ता. बारामती) : मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने २७ व्या कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.
यावेळी युद्धात शौर्य गाजवणारे योद्धे तसेच श्री. सतिश गायकवाड, श्री. चंद्रकांत सोनवणे, श्री. अनिल शिंदे, श्री. प्रशांत शेंडकर, श्री. रविंद्र शिंदे, श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक आजी-माजी सैनिकांचा विशेष सत्कार-सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना श्री. सतिश गायकवाड व श्री. चंद्रकांत सोनवणे यांनी कारगिल युद्धातील आपल्या अनुभवांना उजाळा देत सांगितले की, “कारगिल युद्ध हे भारतीय लष्करासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैन्याने शत्रूशी सामना केला. २६ जुलै १९९९ रोजी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्या काळात अत्याधुनिक नेव्हिगेशन सुविधा उपलब्ध नव्हत्या. भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या अदम्य शौर्य, पराक्रम, देशभक्ती आणि बलिदानामुळे हा विजय शक्य झाला.”
यावेळी कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षा तसेच युवकांनी राष्ट्रप्रेमाची भावना जोपासण्याची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “भारतावर अनेकदा युद्ध लादले गेले, मात्र भारताने प्रत्येकवेळी शौर्याने व यशाने प्रत्युत्तर दिले आहे. विद्यार्थ्यांनी भारतीय लष्कराच्या बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती आदर ठेवावा.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. राहुल गोलांडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रा. डॉ. कल्याणी जगताप तसेच प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे नियोजन संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाने केले. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणारा हा उपक्रम ठरला असून, कारगिल विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महाविद्यालयाने घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.












