मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

मांजरीतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे १२ दिवसांपासून बेमुदत उपोषण

mnewsmarathi 25 Aug 2026 1 मिनिट वाचन 4,431 वाचन

प्रतिनिधी

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट; विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी बाराव्या दिवशीही सुरूच होते. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून, अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सोमवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेत त्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपोषणाला बसलेल्या विद्यार्थी राहुल धनवे यांची प्रकृती मागील काही दिवसांत अधिक खालावल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचेही सांगण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून, यकृतावरही परिणाम होण्यास सुरुवात झाल्याचे डॉक्टरांनी सूचित केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ भांडे, सूरज कोकणे, नीलेश सोनवणे, रवींद्र लोटे यांच्यासह अन्य विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत आदिवासी विकासमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर सुमारे आठ तास प्रतीक्षा करूनही मंत्र्यांची भेट झाली नसल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले.

शासनाकडून आंदोलनाची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी प्रतिनिधींनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने चर्चा करावी आणि प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, उपोषणाचा कालावधी वाढत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याने शासन प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी म्हटले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi