इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ तरुणाला महागात; सुपा पोलिसांची शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई
प्रतिनिधी.
सुपा : सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी शस्त्रांचे प्रदर्शन करत ‘रील’ बनविणाऱ्या तरुणांवर आता पोलिसांची करडी नजर आहे. इन्स्टाग्रामवर पिस्तूलसदृश वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक व धमकीवजा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी बाबुर्डी (ता. बारामती) येथील प्रेम प्रताप जगताप याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सुपा पोलीस ठाण्याच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये प्रेम जगताप हा पिस्तूलसदृश वस्तू हातात घेऊन व्हिडिओ करताना दिसून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
व्हिडिओवर ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर असून, त्यामध्ये ‘शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानून भी अपना है’ अशा प्रक्षोभक स्वरूपाच्या ओळी वापरण्यात आल्या होत्या. तसेच व्हिडिओच्या ऑडिओमध्ये हल्ल्याचा संदर्भ असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंके व भाऊसाहेब चौधरी यांचा समावेश होता.
रीलसाठी ‘रिअल’ आयुष्य धोक्यात घालू नका
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी शस्त्रांचे प्रदर्शन करणे किंवा दहशत निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित करणे कायद्याच्या कचाट्यात आणू शकते. अशा प्रकारांवर सायबर मॉनिटरिंगद्वारे लक्ष ठेवले जात असून, आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे.
“रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका. सोशल मीडियावरील आभासी भाईगिरीच्या नादात कायद्याचा भंग करून स्वतःचे भवितव्य अडचणीत आणू नये,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
