मुंबई : प्रतिनिधी
‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ शर्यतींमधील विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
टाटा कन्सल्टन्सीच्यावतीने मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘हर दिल मुंबई’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे 55 हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. इलाईट गटातील स्पर्धांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ड्रीम रन’ ला सुरूवात झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईकरांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.
स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार झीशान सिद्धीकी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, टाटा कन्सल्टन्सीचे उज्वल माथुर, अनिल सिंह, विवेक सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या मॅरेथॉनमध्ये इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल मेन, इलाईट मेन ॲथेलिट इंटरनॅशनल वुमन, इलाईट ॲथेलिट इंडियन मेन, इलाईट ॲथेलिट इंडियन वुमन यासह पुर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. ड्रीम रन, सिनियन सिटीझन रन, चॅम्पीयन विथ डिसॲबिलीटी रन या प्रकारांचा समावेश करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.