प्रतिनिधी
शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार करण्यासह कोयत्याने वार केल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर हा हल्ला करण्यात आला. चार दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आला असताना त्याच्यावर हल्लेखोरांनी हल्ला चढविल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांनी मंदार किवळे याच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला, तसेच कोयत्यानेही वार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या दोन्ही हातांना मार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. हल्ल्यानंतर आरोपी तोपखाना चौकाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिस्तुलाचे मॅगझीन आणि मोबाईल पडल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. घटनास्थळाचा पंचनामा आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर आता न्यायालयासमोरच गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याची घटना घडल्याने न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
