अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामाजिक

प्रतिनिधी

            महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 755 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

            याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 300 कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या 6 हजार 800 कोटींपैकी 6 हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी 4 हजार 700 कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.