दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या

क्राईम

प्रतिनिधी

वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील कळंब चौक परिसरात घडली. यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. शादाब खान रफीक खान (रा. तायडे नगर) असे मृताचे नाव आहे. मनीष सागर शेंद्रे (रा. सेजल रेसिडेन्सी, अंबिका नगर यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी रात्री आरोपी मनीष शेंद्रे हा कळंब चौक परिसरातून दुचाकीवर मैत्रिणीसह जात असताना शादाब खान रफीक खान यास वाहनाचा कट लागला. त्यामुळे आरोपी व मृतक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी मनीषने घरी जाउन देशी कट्टा आणला. तो परत कळंब चौक येथे आला. त्याच्या पाठोपाठ त्याची मैत्रीणसुध्दा आली. यावेळी आरोपीने तुम्ही मला व माझा मैत्रीणीला शिवीगाळ का केली, असा प्रश्न करत शादाब खान याला यास जाब विचारला.

तेव्हा मृतक व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. आरोपी मनीष शेंद्रे याने त्याच्या जवळच्या देशी कट्टयातून शादाब खान याच्यावर गोळी झाडली. त्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. शादाब खान रफीक खान याच्या छातीत गोळी लागली. त्याला शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मनीष शेंद्रे यास ताब्यात घेतले.

यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. परिसरामध्ये शांतता असून पोलीस ठाण्याच्या हद्यीमध्ये फिक्स पॉईट व अतिरीक्त बंदोबस्त नेमण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे आधारसिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, शहरचे ठाणेदार सतिश चवरे यांनी घटनास्थळ गाठले. सदर घटनेसंबधाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी केले आहे.