प्रतिनिधी
कौटुंबिक कलहातून पती अंबादास तलमले (५०) याने पत्नी अल्का तलमले (४०), मोठी मुलगी प्रणाली तलमले (२०), लहान मुलगी तेजू तलमले (२०) या तिघांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती अंबादास तलमले पत्नी अल्का, दोन मुली व एका मुलासह मौशी या गावी राहत होता. पत्नी अल्का हीचेसोबत अंबादास याचे सतत भांडणे होत होते. आज रविवार ३ मार्च रोजी सकाळी मुलगा घराबाहेर गेला तेव्हा घरातील सर्व मंडळी झोपलेली होती. नेमकी हीच संधी साधत अंबादास याने झोपेत असलेल्या पत्नी व दोन मुली यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले व तिघांची हत्या केली. दरम्यान, सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. लगेच नागभिड पोलीसांना माहिती देण्यात आली.
त्यांनी घटनास्थळी येवुन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. संशयीत आरोपी पती अंबादास तलमले याला पोलीसांनी अटक केली आहे. घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास नागभीड पोलिस करीत आहे. हत्येचे कारण अजून समोर आलेले नाही.