प्रतिनिधी
शेत जमीन मोजणी, तसेच हद्द निश्चितीसाठी मध्यस्थाच्या मार्फत तीन हजारांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास (लिपिक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भूकरमापक अधिकारी शिवराज यशवंत बंडगर (वय २४), मध्यस्थ अमोल विष्णू कदम (वय २७, रा. सरहदवाडी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार शेतकऱ्याची शेतजमिनीची हद्द कायम करण्याकरिता त्यांनी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून त्यासाठी लागणारे शासकीय शुल्क तक्रारदार यांनी भरले होते. भूकरमापक अधिकारी शिरूर तालुक्यातील धामारी येथे आले होते. त्यांच्याबरोबर अमोल कदम होता. कदमने तक्रारदारांकडे दोन गटाची शेतजमीन मोजणी, तसेच हद्द निश्चित करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा लावून शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या कदमला पकडले. कदम याच्या मार्फत लाच घेणारे बंडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.