सोमेश्वर नगर प्रतिनिधी.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महिला सबलीकरण आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर- वाघळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मंगळवार दि. 12 मार्च 2024 रोजी आयोजित केला होता. तसेच दुसऱ्या सत्रात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.30 वा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे व प्रमुख अतिथी विमलताई माळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. जया कदम यांनी केले. या प्रसंगी त्या म्हणाल्या की, “आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. शेतीतील मजुरापासुन ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आज इतिहास अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की स्त्री एक अगाध शक्तीचे रूप होते आणि आहे. कुटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपविण्याऐवजी निर्णय घेण्यात तिला सामिल करून घ्यायला हवे. स्त्री सन्मानाची सुरवात आणि तिचे अस्तित्व मूल्य आपल्या घरापासुन जपायला हवे. तरचं आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणे केवळ एका दिवसापुरते मर्यादित नाही तर समानता आणि सशक्तीकरणाची तत्त्वे प्रत्येक दिवशी पाळली पाहिजेत.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माननीय प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले की, “स्त्रीची संवेदना, संघर्ष, त्याग, विचार यावरच समाज उभा आहे आणि याचीच अभिव्यक्ती साहित्यात आणि काव्यात होत असते. मातीशी निगडित व्यक्तींचा सन्मान करून विद्यार्थ्यांना वेगळी वाट चोखंदळण्याचे कार्य हे महाविद्यालय नेहमीच करत आले आहे आणि यापुढेही करत राहील. काहीतरी असामान्य कर्तृत्व करणाऱ्यांचे आमच्या महाविद्यालयात नेहमीच स्वागत असते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिला दिन साजरा करण्याचे प्रमुख कारण म्हणजे आजही समानतेचा अभाव दिसतो. भेदभाव केला जातो. त्या विचारांचे निर्मूलन करून महिलांना जगाच्या तुलनेमध्ये पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने असे उपक्रम घेतले जातात. जगभरातील ज्या क्रांती झाल्या त्या सर्वांच्या पाठीमागे कुठेतरी स्त्री होती आणि ही क्रांती शिक्षणाच्या माध्यमातूनच होऊ शकते. त्यासाठी हे व्यासपीठ आहे. यातूनच अशा प्रकारचे आयोजन केले जाते.”
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि सत्कारमूर्ती आधुनिक बहिणाबाई आणि ‘खुरपं’ ही डिग्री असणाऱ्या विमलताई माळी यांनी त्यांचा सृजनाचा अखंड प्रवास डॉ. जया कदम यांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून कवितेच्या माध्यमातूनच उलगडून दाखवला. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी कवितेतून उत्तर दिले. संवाद साधत त्यांनी त्यांच्यातील सर्जकशोधाला श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, “मला दिलेली डिग्री म्हणजे खुरपं जी मला काळया आईने दिलेली आहे. भारतातील स्त्रियांनी असे घडावे की संपूर्ण जगाने त्यांचे अनुकरण करावे. खरे तर स्त्रीला स्वातंत्र्य हवे आणि दिलेही गेले पण त्याचा स्वैराचार व्हायला नको.” बदलत्या युगानुसार स्वतः मध्ये बदल घडवणे, सासु सुनेचे नाते हळुवार सावरणे, पुरुषांचा आदर सन्मान करणे या आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सहचर हा आधार म्हणून समोर आला पाहिजे. रथाची दोन चाके म्हणून पुरुषांचा सन्मान करा. आपण त्याच्याआधारेच सक्षम होऊ शकतो. समजून घेतले तर सगळेच पुरुष विचित्र नसतात. काही पुरुष फुलेसुद्धा असतात. त्यामुळे “रडू नको लढायला शिक. समर्थपणे घरावर राज्य करायला शिक.” असा कानमंत्रही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. साधेसुधे दैनंदिन जीवन जगणाऱ्या, शेतमजुरी करणाऱ्या विमलताईंनी विविध प्रकारची काव्यरचना केलेली दिसते. स्त्री शक्तीचा महिमा गात शेतकऱ्यांच्या दुःखी आणि कष्टी जीवनसंघर्षाबरोबरच व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारी, माणुसकीचे धडे देणारी, मातृभूमीचा महिमा गाणारी, थोर नेत्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी, नातेसंबंधाचे महत्त्व पटवणारी त्यांची कविता विविध रंगी आणि विविध ढंगी आशयघनता असणाऱ्या त्यांच्या कवितेचे फलित म्हणजे त्यांच्या काव्यातील गेयता.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये महाविद्यालय परिसरातील कवयित्रींना निमंत्रित करण्यात आले होते. तसे पाहिले तर या सर्वच कवयित्री कवितेच्या दालनात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या आहेत. त्यांच्या या निर्मितीचे कौतुक करणे, त्यांच्या प्रगतीला गती देणे आणि त्यांची भावना समाजापर्यंत पोहोचवणे या उद्देशानेच नवोदित महिलांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये दिपाली गायकवाड (वाघळवाडी),
रूपाली फरांदे (फरांदेनगर), राणी शेंडकर (शेंडकरवाडी), लता रीठे (सोमेश्वरनगर),
स्वाती सोरटे (सोरटेवाडी), शुभांगी जाधव (वाकी चोपडज) या कवयित्रींचा समावेश होता. या सगळ्याच कवयित्रींची कविता स्वयंप्रकाशित आणि स्वानुभावातून साकारलेली असल्याचा प्रत्यय आला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समिती सदस्या प्रा. सुजाता भोईटे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य रवींद्र जगताप, डॉ. निलेश आढाव, डॉ. नारायण राजूरवार, डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा .आदिनाथ लोंढे, प्रा . शिल्पा कांबळे, प्रा. मेघा जगताप, प्रा. नीलिमा निगडे, प्रा. सुचिता नानखिले, प्रा. वनिता कांबळे, प्रा. अर्चना पवार, प्रा. मृणालिनी यादव, प्रा. चैताली फरांदे, प्रा. सारिका राणी आणि महाविद्यालयातील सर्व अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप व प्रा. स्नेहा संवत्सरकर यांनी केले तर प्रा. मेघा काकडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे, सचिव सतीश लकडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला.