हडपसरमध्ये खोक्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली

क्राईम

प्रतिनिधी

तरुणाचा खून करुन मृतदेह खोक्यात बांधून फेकून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली. आर्थिक वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी हडपसर भागातील हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोक्यात सापडला होता. तरुणाचे हात पाया बांधून खोक्याल चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले.

याप्रकरणी निजामुद्दीन पटेल (वय ३०, रा. हांडेवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली. इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ आसिफ मेहबुब पटेल (वय २९, रा. रॉयल मॅरेज हॉलसमोर, थेऊर फाटा, गाढवे मळा, लोणी काळभोर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंगणे मळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक खोके नागरिकांनी पाहिले.खोके बंद करून ते कालव्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले होते. खोके उघडल्याानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. तरुणाचे हात पाय बांधण्यात आले होते. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरुणाची ओळख पटलेली नव्हती. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला. शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणांची माहिती घेण्यात आली. कोंढवा परिसरातून इम्रान पटेल बेपत्ता झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पटेलच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली.

पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा इम्रानच्या खूनापूर्वी आदल्या दिवशी सायंकाळी निजामुद्दीनने त्याला बोलावून घेतले होते. आर्थिक वादातून निजामुद्दीनने इम्रानच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. या घटनेत इम्रानचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर निजामुद्दीनने त्याचे हात पाय दोरीने बांधले. एका खोक्यात मृतदेह ठेवला. हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ खोके टाकून तो पसार झाला. तपासात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, समीर पांडुळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ यांनी ही कामगिरी केली.

आरोपी निजामुद्दीन आणि इम्रान यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाले होते. आरेपीने त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यसाठी हात पाय बांधून खोक्यात भरला. दुचाकीवरुन खोके आणून त्याने हिंगणे मळा परिसरात टाकून दिला. खून प्रकरणात आणखी कोण सामील आहे का?, यादृष्टीने तपास सुरु असल्याचे परिमंडळ पाचचे पोलीस उपयाुक्त आर. राजा यांनी सांगितले.