प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील डव्वा येथे झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. या अपघातात भंडारा जिल्ह्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आजारी नातेवाईकांना पाहायला जात असलेल्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आणि दोघांनीही या अपघातात प्राण गमावले. मात्र त्यात त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला बचावला. पिपरी पुनर्वसन गावातील राजेश देवराव लांजेवार (३८) आणि मंगला राजेश लांजेवार (३०) असे या दांपत्याचे नाव असून सियांशु राजेश लांजेवार हा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये साकोली तालुक्यातील चांदोरी येथील वृध्द दाम्पत्य रामचंद्र कनोजे व अंजिरा रामचंद्र कनोजे तसेच पिपरी येथील मंगला राजेश लांजेवार व राजेश देवराम लांजेवार दाम्पत्याचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांना धक्का बसला. या घटनेची माहिती घेण्यासाठी कुटुंबीयांनी पोलीस, वाहतूक विभाग आणि प्रशासनाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असता, त्यांच्याच घरातील लोक या अपघाताचे बळी ठरल्याचे समोर आले. या वृत्तानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी येथून डव्वा गावाच्या मध्यभागी वृंदावन टोला फाटेजवळ भंडारा आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच ०९/ईएम १२७३ ही बस भंडारा येथून गोंदियाकडे जात होती. बसचालक प्रणय रायपूरकर याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या ३४ प्रवाशांपैकी ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात पिपरी पुनर्वसन गावातील राजेश देवराव लांजेवार (38) आणि मंगला राजेश लांजेवार (30) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत उपस्थित असलेला सियांशु राजेश लांजेवार हा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राजेश हा शेतकरी होता आणि त्याचे आई-वडील आणि मोठा भाऊ असे संयुक्त कुटुंब होते. गोंदिया जिल्ह्यातील दांडेगाव येथे राहणारे नातेवाईक किशोर हरडे हे आजारी आहेत. त्यांच्यावर गोंदियातील केटीएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश ए मंगला त्यांचा मुलगा सियांशु यांच्यासह किशोर हरडे यांना भेटण्यासाठी व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवशाही बसने गोंदियाला जात असताना हा अपघात झाला.